17 December 2017

News Flash

माही ‘गुल’

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मुलाखत देत असताना भर मुलाखतीत मद्याचा अमल जास्त झाल्याने त्या मुलाखती रद्द

प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 17, 2013 7:09 AM

बॉलिवूडमधील तारका आणि मद्य यांचे नाते खूपच जुने आहे. दारूच्या व्यसनापायी स्वत:चा बट्टय़ाबोळ करून घेतलेल्या अनेक नटय़ा या चंदेरी पडद्याने बघितल्या आहेत. वेगवेगळ्या पाटर्य़ामध्ये आपल्या सौंदर्याच्या रंगाबरोबरच असेही रंग उधळणाऱ्या अनेक नटय़ा आजही आसपास वावरताना दिसतात. या नावांत माही गिल या सौंदर्यवतीची भर पडली आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मुलाखत देत असताना भर मुलाखतीत मद्याचा अमल जास्त झाल्याने त्या मुलाखती रद्द करण्याची वेळ माहीवर नुकतीच आली. मात्र आता हासुद्धा प्रसिद्धीचा काही वेगळाच प्रकार आहे का, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
सध्या ‘साहेब, बिबी और गँगस्टर रिटर्न्‍स’ या चित्रपटाच्या निमित्ताने माही अत्यंत नवाबी थाटात वावरत आहे. पण तिचे हे थाटमाट सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. सोहा अली खानसह चालू असलेले सेटवरील तिचे शीतयुद्ध मध्ये चर्चेत होते. त्यानंतर याच चित्रपटाच्या निमित्ताने माही गेल्या आठवडय़ात काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मुलाखत देणार होती. चित्रपट अत्यंत शाही खानदानाशी निगडित असल्याने मुलाखतींसाठीही राजेशाही थाट ठेवण्यात आला होता.
गाद्यागिद्र्यावर बसलेली माही आणि तिच्या दिमतीला असलेले सेवक आणि सेविका अशा थाटात मुलाखती सुरू झाल्या. चित्रपटात रंगेल सुनेची भूमिका निभावणारी माही जणू आपण ‘ऑन स्क्रीन’ अभिनय करत असल्याच्या थाटात मद्याचे घुटके घेत होती. काही वेळाने मद्याने आपला रंग दाखवायला सुरुवात केली आणि माहीचे भान हरपले. नंतर तर एवढी वेळ आली की, उर्वरित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंना रिक्त हस्तानेच परतावे लागले.
माहीचे हे मद्यप्रेम सार्वकालिक आहे की, याच चित्रपटापुरते, हा मात्र सध्या चर्चेचा विषय आहे. पण माहीचे निकटवर्तीय मात्र हा केवळ प्रसिद्धीसाठी केलेला खटाटोप असल्याचे सांगत आहेत.

First Published on February 17, 2013 7:09 am

Web Title: mahi guil