प्रत्येकालाच आपल्या लाडक्या आणि नावाजलेल्या व्यक्तींबाबत जाणून घ्यायला खूप आवडतं. ही मंडळी त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये कशी आहे, त्यांचे विचार काय आहेत, त्यांचा जीवनप्रवास कसा होता, कसे ते या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले असे बरेच प्रश्न सामान्य माणसांच्या मनामध्ये असतात. या नावाजलेल्या व्यक्तींचे आपण मोठेपण बघितले आहे पण ते माणूस म्हणून कसे आहेत, त्यांची कधी न पाहिलेली बाजू आणि त्यांच्याबद्दलचे कधी न ऐकलेले किस्से आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या नव्या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमात पाहुण्यांबरोबरच असणार आहेत इरसाल नमुने जे या पाहुण्यांशी गप्पा तर मारणारच आहेत पण त्यांच्या अतरंगी, खुसखुशीत विनोदशैली तसेच त्यांचे बेधडक, बिनधास्त विनोदाने प्रेक्षकांना दर्जेदार आणि निखळ विनोदाची मेजवानीदेखील मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे करणार आहे. येत्या २० सप्टेंबरपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून गुरुवार आणि शुक्रवार रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाज सेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद अनासपुरे मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. किशोर चौघुले, प्राजक्ता हनमघर, भूषण कडू, ओंकार भोजने हे काही इरसाल पात्र या कार्यक्रमाची रंगत अजून वाढवणार आहेत. कार्यक्रमात कलर्स मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिकांमधील लाडक्या सासू म्हणजेच ‘घाडगे & सून’मधील सुकन्या कुलकर्णी आणि अतिशा नाईक तर ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतील कविता लाड, तसेच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, उज्ज्वल निकम, भरत जाधव, केदार शिंदे ही मंडळी हजेरी लावणार आहेत. तेंव्हा या लोकप्रिय मंडळींची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे बघण्याची संधी मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कार्यक्रमाबद्दल सूत्रसंचालक मकरंद अनासपुरे म्हणाले की, ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने हा थोडासा वेगळा कार्यक्रम आहे. कारण विविध क्षेत्रात यशस्वी झालेले व्यक्ती या कार्यक्रमामध्ये येणार असून त्यांच्याविषयी आपल्याला थोडीफार माहिती असते परंतु या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्या अंतरंगाचा शोध घेणार आहोत. त्यांच्या क्षेत्राशी निगडीत नसलेल्या इतर क्षेत्राबद्दल तसेच दुसऱ्या गोष्टींबद्दल त्यांच मत त्यांचे विचार हे सगळ विस्ताराने समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. थोडं मिश्कील, थोडं गंभीर असं मिश्र स्वरूपाचा हा कार्यक्रम असेल.’