‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ मिळालेले पाच पुरस्कार, ‘मामि’ महोत्सवात आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा विभागात एकमेव भारतीय चित्रपट म्हणून मानाने केलेला प्रवेश आणि समीक्षकांसह प्रेक्षकांचीही दाद मिळवणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार झाला आहे. ‘पीव्हीआर’ समूहासारख्या नामांकित वितरक संस्थेने ‘फँड्री’ देशभर प्रदर्शित करण्यासाठी पुढाकार घेतला असून २८ फेब्रुवारी रोजी तो १२ राज्यांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित केला जाणार आहे.
फोटो गॅलरी : ‘फॅन्ड्री’ची लोकसत्ता कार्यालयाला भेट
गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत असलेल्या ‘फँड्री’च्या कलाकारांनी बुधवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली. ‘फॅंड्री’ ही उत्तम कलाकृती कशी जन्माला आली इथपासून ते देशोदेशीच्या महोत्सवात फिरून आलेल्या ‘फॅंड्री’ने मोठय़ा हिंदी चित्रपटांना मागे टाक त बॉलिवूडकरांना आपली दखल कशी घ्यायला लावली, हे अनेक गोष्टी, किस्से यामधून उलगडत गेले.
दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते किशोर कदम यांच्याबरोबर आवर्जून उपस्थित असलेल्या ‘फँड्री’चा नायक (जब्या) सोमनाथ अवघडे, (पिऱ्या) सुरज पवार आणि (शालू) राजेश्वरी खरात यांनीही आपले अनुभव सांगितले.
हा चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाला, तो कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा भाषेचा असो.. तो आपला चित्रपट वाटतो. हेच या चित्रपटाचे यश आहे, असे आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असल्याचे नागराज मंजुळे यांनी सांगितले.
‘फँड्री’ हा एकमेव असा मराठी चित्रपट आहे. तो देशभरात पोहोचवण्यासाठी ‘पीव्हीआर’ समूहाने स्वत: जाहीर इच्छा व्यक्त केली.
हा चित्रपट भाषेचे बंधन ओलांडून पुढे जाणारा खऱ्या अर्थाने एक अस्सल ‘भारतीय’ चित्रपट असल्याचे ‘एस्सेल वल्र्ड व्हिजन’चे बिझनेस हेड निखील साने यांनी सांगितले.
२८ फेब्रुवारीला ‘फँड्री’ दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगलोर, इंदूर, हैदराबाद, गोवा, बडोदा, अहमदाबाद या प्रमुख शहरात प्रदर्शित होत आहे.