देशात लॉकडाउन सुरु झाल्यापासून अभिनेता सोनू सूद मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोनू सतत चर्चेचा विषय ठरत आहे. यात अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्याकडे मदत मागत आहेत. विशेष म्हणजे सोनूदेखील शक्य होईल तशी त्यांना मदत पुरवत असून सध्या सोनूचं एक ट्विट सोशल मीडियावर चर्चिलं जात आहे. एका व्यक्तीने सोनूकडे मदत मागितल्यानंतर त्यावर सोनूने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने ट्विट करत मला आणि माझ्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेशमध्ये जायचं आहे, असं सांगत सोनूकडे मदत मागितली होती. त्यावर सोनूने हटके उत्तर दिलं आहे.

“नमस्कार सर, माझं नाव रामधनी प्रजापती असं असून मी आणि माझे कुटुंबीय गेल्या ३ महिन्यांपासून मुंबईमध्ये अडकलो आहोत. हातात कामदेखील नाही आणि जितके पैसे आमच्या जवळ होते ते सगळे संपले आहेत. त्यामुळे आम्हाला गावी जायचं आहे. उत्तर प्रदेशमधील जोनपूरमध्ये. पत्नी आणि तीन मुलांना या परिस्थिती सांभाळणं कठीण झालं आहे. कृपया आमची मदत करा”, असं ट्विट या व्यक्तीने केलं. त्यावर सोनूने त्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.


“तुमच्या नावातच राम आणि धनी आहे. मग चिंता कशाची? तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना लवकरच घरी पोहोचवू. जर दोन दिवसांपूर्वी सांगितलं असतं, तर आतापर्यंत तुम्ही तुमच्या घरी असतात. करतो काही तरी”, असं उत्तर सोनूने दिलं आहे.

दरम्यान, सोनूचं हे उत्तर पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षावर केला आहे. सोनू गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने गरजुंची मदत करत आहे. त्याने आतापर्यंत हजारो मजुरांना त्यांच्या गावी पाठविलं आहे.