झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित अभिनेत्री कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये कंगना झाशीच्या राणीच्या भूमिकेत आहे. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण कंगनासाठी या चित्रपटाचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. आधी दिग्दर्शक आणि त्यानंतर अभिनेता सोनू सूदने मध्येच हा चित्रपट सोडला होता. आता कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनू सूदला खडेबोल सुनावले.

‘चित्रपट सोडल्यानंतर त्याला चित्रपटाबाबत काहीच बोलण्याचा अधिकार नाही. त्याने चित्रपटाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये,’ असं कंगना म्हणाली. त्याचप्रमाणे सोनू त्याच्या वैयक्तिक हेतूंमुळे चित्रपटाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप तिनं यावेळी केला.

‘मणिकर्णिका’चं चित्रीकरण अर्ध्यावर सोडून सोनू या चित्रपटातून तडकाफडकी बाहेर पडला होता. त्यानंतर कंगना आणि सोनूमध्ये शाब्दिक युद्धही रंगलं होतं. कंगनानं चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळल्यानंतर सोनूनं चित्रीकरण अर्ध्यावर आलं असताना माघार घेतली होती. त्यावेळी ‘एका महिला दिग्दर्शिकेच्या हाताखाली काम करणं सोनूला जमलं नाही. त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला’ अशी बोचरी प्रतिक्रिया कंगनानं दिली होती.