जतिन वागळे दिग्दर्शित ‘मांजा’ या चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी इंडिया स्टोरीज या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अश्विनी भावे, सुमेध मुद्गलकर आणि रोहित फाळके यांच्या भूमिका असलेला ‘मांजा’ हा चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपल्या सभोवताली असणाऱ्या बांडगुळ स्वभावाच्या माणसांवर भाष्य करणारा मांजा या चित्रपटाचा टिझर थक्क करणारा आहे. सुमेध आणि रोहित ही दोन मुलं आणि त्यांच्यातील टिझरमध्ये दाखविण्यात आलेला संवाद हा तुम्हाला गोंधळात टाकू शकतो. भीती, ड्रग्ज असं संभाषण करत एक्सप्रेस हायवेवर उभे असणारे दोन मित्र आणि त्यातील एकाने केलेल्या विक्षिप्त प्रकाराने लक्षात येतं की नक्कीच हा चित्रपट एका आगळ्यावेगळ्या प्रवृत्तीवर भाष्य करतो. आजच्या पिढीतील मुलं आयुष्यात थ्रिल अनुभवण्यासाठी कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात असा प्रश्न आपल्याला हा टिझर पाहिल्यावर पडतो.

एमएफडीसी प्रस्तुत मांजा हा चित्रपट २१ जुलै रोजी जागतिक पातळीवर प्रदर्शित होणार आहे. नितीन केणी आणि मनीष वसिष्ट यांची एमएफडीसी ही कंपनी मराठी चित्रपट निर्मिती आणि वितरण या क्षेत्रात कार्यरत आहे.