राम मंदिराच्या मंदिर उभारणीच्या कामाला खऱ्या अर्थानं सुरूवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच भूमिपूजन होत असून, संपूर्ण अयोध्या नगरीत उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. सजावटीपासून ते भूमिपूजनापर्यंत सर्व कार्यक्रम निश्चित झाला असून, भाजपाचे नेते आणि गायक मनोज तिवारी यांनाही राम जन्मभूमी सोहळ्यावर गाण लिहायचा मोह आवरता आला नाही. एका रात्रीतून त्यांनी गाण तयार केलं आणि ट्विट करून सगळ्यांना माहिती दिली.

अयोध्येत करोनामुळे गर्दी कमी असली तरी देशभरात भक्ती सागराला उधाण आलं आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं आनंद व्यक्त करत आहे. भाजपाचे दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि अभिनेते मनोज तिवारी यांनी एक स्पेशल गाण लिहिलं आहे. मंगळवारी रात्री तयार करण्यात आलेलं गाण रिलीजही करण्यात आलं आहे. भक्तरसात न्हाऊ घालणाऱ्या या गाण्याचे बोल ‘जहॉ जगत में राम पधारे, उसी अयोध्या जाना है’ असे आहेत.

करोनामुळे अयोध्येत होत असलेल्या कार्यक्रमाला मोजक्याच व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मनोज तिवारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. मात्र, त्यांनी या भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रभूरामचंद्रांचं आणि अयोध्येचं वर्णन करणार सुंदर गीत यानिमित्तानं लिहिलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूमिपूजन स्थळी दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत त्यांचं स्वागत केलं. यानंतर ते भूमिपूजन स्थळी दाखल झाले. या  ठिकाणी त्यांनी हनुमान गढी येथे पूजादेखील केली. तसंच पंतप्रधान आणि योगी आदित्यनाथ यांनी या ठिकाणी पारिजातकाचं वृक्षारोपणही केलं.