कॉलेज आठवणींचा कोलाज

अभिजित खांडकेकर, अभिनेता

ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
Essay on My Favourite Teacher goes viral
VIRAL: ६ वीतल्या विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात; भूमिका मॅडमसाठी लिहिलेला निबंध होतोय तुफान व्हायरल
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

नाशिकच्या भिकुसा यमासा क्षत्रिय म्हणजेच बी.वाय.के कॉलेजमधून मी माझं पदवीशिक्षण पूर्ण केलं. नाशिकमध्ये कॉलेज रोड म्हणून एक रस्ता प्रसिद्ध आहे. कारण नाशिक शहरामधली सर्वच महत्त्वाची कॉलेजेस तिथे बऱ्यापैकी एकाच रस्त्यावर एकवटली आहेत. त्यामुळे इथली स्पंदनं काही निराळीच आहेत. कॉलेज रोडला फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेंटाईन डेला सणाचं रूप आलेलं असत. आमचं कॉलेज म्हणजे करण जोहरच्या चित्रपटातलं वाटावं अस कॉलेज. दूरदूरवरून स्पेशल मुलंमुली बघण्यासाठी आमच्या कॉलेजला एकच गर्दी व्हायची.

माझे बाबा बँक ऑफ महाराष्ट्रला ब्रँच मॅनेजर होते. आणि परिवारतले बरेचसे सदस्य सी.ए,सी.एस.कडे वळले असल्याने कला क्षेत्राची आवड असूनसुद्धा मी वाणिज्य शाखेकडे वळालो. विद्यार्थ्यांकडे करियर ऑप्शन नसतात. नवल वाटेल पण माझ्याकडे त्यावेळी अकरा करियरचे पर्याय होते. ज्यामध्ये वाणिज्य,मीडिया आणि डिफेन्सच्या पर्यायांचा समावेश होता. कॉलेजचा पहिला दिवस तसा दडपणाखाली गेला. कारण शाळेत मी पूर्णपणे मराठी माध्यमात शिकलेलो. त्यामुळे यापुढे  इंग्रजीत शिक्षण घ्यावं लागणार या कल्पनेने मला भीती वाटत होती. कॉलेजच्या सुरुवातीला मला थोडा न्यूनगंड होता. पण काही काळाने तो मीच प्रयत्नांनी दूर केला आणि हळूहळू मी कॉलजेच्या प्रवाहात एकरूप झालो. नंतर नंतर तर कॉलेजमध्ये माझा बहुतांश वेळ हा पार्किंग एरियात जायला लागला. कॉलेजमध्ये यायचं, गाडी लावायची व गाडीवर बसून मस्तपैकी मित्रांसोबत गप्पा मारायच्या हा माझा कॉलेजमधला दिनRम झाला. कॉलेजमध्ये येऊन लेक्चरला बसण्याचे तर माझे रेकॉर्डच असायचे. बारावीला तर मी संपूर्ण वर्षभरात केवळ तीनदा लेक्चरला बसलो. पहिल्यांदा बसलो ते कॉलेजच्या पहिल्या दिवशी वर्ग कुठे आहे ते पाहण्यासाठी, दुसऱ्यांदा बसलो मित्राला वही द्यायला म्हणून गेलो आणि कल्टी मारणार तेवढय़ात सर आले म्हणून नाइलाजाने आणि तिसऱ्यांदा सबमिशनच्या वेळी. याचा अर्थ मी अभ्यास अजिबातच करायचो नाही असा होत नाही. घरच्यांनी स्पेशल क्लासेस लावून दिले होते. त्याच्यात जाऊन आम्ही मित्र व्यवस्थित अभ्यास करायचो. लेक्चरला बसणं हे कल्चरच मुळी आमच्यावेळी नव्हतं.

कॉलेजमध्ये असताना मी अनेक स्पर्धामध्ये सहभागी झालो व थेटर विश्वात रमलो. अकरावीला प्रवेश घेतल्याबरोबर मी नाशिकच्या स्वप्नगंध या संस्थेला भेट देऊन त्यांच्यासोबत पहिलं नाटक केलं, जे मराठी राज्यनाटय़ स्पर्धेत सहभागी होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पहिलं आलं होतं. माझी अभिनयाची वीट याच उदाहरणार्थ नामक नाटकामुळे रचली गेली व रंगभूमीशी नाळ जोडली गेली. मग पुढे पु.ल करंडक,सकाळ करंडक,अल्फा करंडकमध्ये सहभागी झालो. अल्फा करंडकसाठी एक एकांकिका मी स्वत: दिग्दर्शित केली. वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धासुद्धा जिंकल्या. एकदा असाच कॉलेजमध्ये पार्किंग एरियामध्ये गप्पा मारत असताना एक मित्र आला व त्याने सांगितलं की बाजूच्या कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धा सुरू आहे. मी व माझा एक मित्र आम्ही अचानक गेलो आणि ढाल जिंकून आलो. असे अनेक किस्से आहेत.

मिस्टर बी.वाय.के स्पर्धा तर सलग तीन वर्षे मीच जिंकत होतो.या अनुभवातूनच पुढे मला नाशिकच्या एका लोकल न्यूज चॅनेलमध्ये वृत्त निवेदकाची संधी चालून आली. आणि सलग काही वर्षे मी कॉलेज संभाळून निवेदकाचं काम केलं. या कामाचा फायदा मला कॉलेजमध्ये ओरल एक्झाममध्ये झाला. सर, मॅडम सगळे जण मला बघायचे, ओळखायचे. त्यामुळे सर्वजण सांभाळून घ्यायचे.

कॉलेजमध्ये असताना मी प्रचंड खवय्येगिरी केली आहे. त्यावेळी आमच्याजवळ फार पैसे नसायचे. त्यामुळे जे काही ते शेयरिंग करून हे गणित पक्क असायचं. बिजू दाबेली आणि कॅन्टीनमधली मिसळ मी आजही मिस करतो.

नाशिकमध्ये सर्व मिसळगृहामध्ये एक नियम आहे की मिसळ आणि पावचेच पैसे आकारले जातात. रस्सा हा अमर्यादित असतो. एकदा आम्ही मित्रांनी उगाच कॉलेज कॅन्टीनमध्ये किडे केले. एक मिसळ व बारा पाव मागवले व ती नऊ मित्रांनी वाटून खाल्ली. आमचा हा नाठाळपणा कँटीनचा मालक आ वासून बघत होता. शेवटी तो स्वत: येऊन म्हणाला की मी २ मिसळ फुकट देतो पण प्लीज असं नका खाऊ. पण आम्ही ‘खायएंगे तो एक ही थाली मे’ हा उगाचच नारा लावला होता. असे खाण्याच्या बाबतीत कॉलेज दिवसांमध्ये अनेक वेडे चाळे केले आहेत. नाशिकमध्ये गावात शौकीन भेळवाल्याकडे झटका पाणीपुरी ‘४४० वोल्ट’ या नावाने मिळते. नावावरूनच कळलं असेल ती कसली झणझणीत असेल. ती खाण्यासाठी आम्ही गर्दी करायचो. कॉलेज रोडला मामाची पावभाजी, श्रीकृष्णचा मसाला पाव, समर्थ ज्यूस सेंटर, अकबर सोडा दर रविवारी श्यामसुंदर, विहार किंवा के.वि.ची मिसळ म्हणजे निव्वळ जिव्हातृप्ती!

कॉलेजचा शेवटचा दिवस हा खूप भावुक होता. कारण माझा कॉलेजमध्ये खूप मोठा ग्रुप होता. त्याचसोबत तालमीचा व इतरही छोटे मोठे ग्रुप होते. सर्वांना रामराम देणं मला थोडं जड गेलं. अशा रीतीने मी माझं पदवी शिक्षण पूर्ण केलं व पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्येच्या माहेरघरी म्हणजेच पुणे येथे कूच केली. नाशिकमधून पुण्याला जाताना मला बस स्टँडवर माझे सर्व १५-२० मित्रमैत्रिणी सोडायला आले होते. पुणे विद्यापीठातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीमधून मी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. इथेही माझ्या अनेक आठवणी आहेत. पण नाशिकचं कॉलेज ते नाशिकचंच.

शब्दांकन : मितेश जोशी