प्रतिनिधी

करोना संकटाच्या काळात आज गणपत्ती बाप्पांचं आगमन झालं आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचं आणि सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. म्हणूनच या काळातही प्रत्येक गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचं दिसून येत आहे. परंतु, यंदा सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने हा दिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला आहे. यात अभिनेता अशोक फळदेसाई गोव्यात दरवर्षी असणारी गणेशोत्सवाची धामधूम मिस करत आहे. त्यामुळेच या काळात गोव्यात नेमकं गणरायाचं आगमन कसं होतं याविषयी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

“माझ्या गोव्याच्या घरी दीड दिवसाचा गणोशोत्सव असतो. मी एकत्र कुटुंबात राहतो. त्यामुळे दरवर्षी सर्वजण एकत्र गणेशोत्सव साजरा करतात. गणपती घरी येतो तेव्हा प्रसन्न वातावरण असतं. तो कधी आला, कधी गेला कळतच नाही. गणपतीला मी कलेचं दैवत मानतो. त्याच्याशी एक भावनिक नातं तयार झालं आहे. त्यामुळे गणपतीला मी कशातही बघू शकतो. गोव्यात विविध संस्था आरतीच्या स्पर्धा आयोजित करतात. यात घुमट, शमेळ आणि झांज ही वाद्यं वाजवून, वेगवेगळ्या चाली लावून नवनवीन आरत्या म्हटल्या जातात. त्यात मी दरवर्षी सहभागी व्हायचो. पण गेल्या वर्षी मी गोव्यात नव्हतो आणि यंदाही नसेन. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. या वर्षी कदाचित आरतीच्या स्पर्धाही होणार नाहीत”, असं अशोक फळदेसाई म्हणाला.

पुढे तो म्हणतात, “गोव्यातही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत. पण मुंबईत जेवढय़ा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होतो, तेवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गोव्यात साजरा होत नाही. तिथली गणेशोत्सव मंडळं नावीन्यपूर्ण देखावे तयार करतात. शेवटच्या दिवशी कुंडांमध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं. त्या दिवशी मात्र भावूक व्हायला होतं. गोव्यात गणेशोत्सवात फटाके फोडण्याची पद्धत आहे. लहानपणी आम्ही भरपूर फटाके फोडायचो. पण त्यातून प्रदूषण होत असल्याने आम्ही फटाके फोडणं बंद केलं. ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेच्या सेटवरही गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा साधेपणाने साजरा होईल. यंदा मुंबईत वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे. मूर्तीची उंची कमी ठेवली जाणार आहे, गर्दी नसेल. गणेशोत्सवाचं हे स्वरूप असंच राहावं असं वाटतं. नाहीतर अलीकडच्या काळात गणेशोत्सव ज्या पद्धतीने साजरा होतो त्यात विद्रूपीकरणच अधिक दिसतं. त्यात वेळ, पैसा सगळंच वाया जातं आणि साध्य काहीच होत नाही. उत्सवाला आलेलं राजकीय स्वरूप आवडत नाही. पण हो, लोकांनी एकत्र यावं यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हायलाच हवा”.

सौजन्य : लोकप्रभा