देशावर करोना विषाणूचं सावट असल्यामुळे प्रत्येक सण आणि उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे सहाजिकच देशातील नागरिकही आखून दिलेल्या नियमांचं पालन करत यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करताना दिसत आहेत. या काळात प्रत्येक जण सोशल डिस्टंसिंगचं पालन करत असल्यामुळे शक्यतो एकमेकांच्या घरी जाण्याचं टाळत आहे. त्यामुळे यंदा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गुरुजींना कसं बोलवावं असा प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे. परंतु, त्यावर अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि जीवनगाणी या युट्युब चॅनेलने भन्नाट मार्ग शोधून काढला आहे.

सध्याच्या काळात निर्माण झालेली समस्या लक्षात घेता जीवनगाणी यांनी एक खास व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि उत्तरपूजा कशी करावी याची यथोचित माहिती देण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता बाप्पाची पुजा करत असून गुरुजी अभिजीत जोशी हे यथोचितरित्या पूजा सांगताना दिसत आहेत. त्यामुळे आता काही कारणास्तव गुरुजींना घरी येणं शक्य नसेल तर हा व्हिडीओ पाहून गणेशभक्त आपल्या बाप्पाची पूजा करु शकतात असं सांगण्यात येत आहे.


दरम्यान, प्राणप्रतिष्ठा पूजा ही जवळजवळ ७० मिनटांची असून उत्तरपूजा ११ मिनटांची आहे. त्यात सर्व स्त्रोत्रे आणि प्रार्थना तसेच शेवटचे गाऱ्हाणे या सर्व बाबींचा समावेश आहे.