01 December 2020

News Flash

VIDEO : सोनाली कुलकर्णीच्या ‘गुलाबजाम’ची रेसिपी पाहिलीत का?

'माझी लाडकी गोष्ट..राधा आणि आदित्यची..'

गुलाबजाम

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि झी स्टुडिओजने अतिशय चवीष्ट पद्धतीने नववर्षाची सुरुवात करत, प्रेक्षकांच्या भेटीला नव्या चित्रपटाचा टीझर आणला आहे. सोनालीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन आगामी ‘गुलाबजाम’ या चित्रपटाचा टीझर पोस्ट केला आहे. ‘माझी लाडकी गोष्ट..राधा आणि आदित्यची..आमच्या स्वयंपाकाची..’, असं लिहित तिने हा टीझर पोस्ट केला.

चौकटीबाहेरच्या चित्रपटांना हाताळणाऱ्या दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी पुन्हा एकदा त्यांचं दिग्दर्शन कौशल्य पणाला लावल्याचं पाहायला मिळत आहे. ‘चांगल्या पदार्थाची पहिली खूण असते त्याचा वास…’ याच ओळीने सुरुवात होणाऱ्या या टीझरमध्ये स्वयंपाकघरात असणारी पदार्थांची रेलचेल पाहायला मिळतेय. स्वयंपाक करताना एखाद्याच्या मनात कोणत्या भावना असतात, मुळात त्याविषयी प्रत्येकाचा दृष्टीकोन कसा असतो, याची झलक या टीझरमधून पाहायला मिळतेय. या टीझरमध्ये कोणत्याही कलाकाराच्या लूकवरुन पडदा उचलला नाहीये. पण, तरीही सोनालीच्या आवाजात प्रदर्शित करण्यात आलेला ‘गुलाबजाम’चा टीझर लक्षवेधी ठरतोय.

वाचा : पुन्हा चरित्रपटांची लाट!

कथेतील नाविन्य हे कुंडलकर यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य. गुलाबजाम टीझरनिमित्ताने पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय येतोय. ‘गुलाबजाम’ ही लंडनमध्ये राहणाऱ्या एका मराठी माणसाची कथा आहे. आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा काही खास मराठी खाद्यपदार्थ शिकण्यासाठी भारतात येतो. भारत भेटीत तो पुण्यात राहणाऱ्या राधाला (सोनाली कुलकर्णी) भेटतो. ती त्याला पारंपरिक मराठी पाककृती शिकवण्याचा निर्णय घेते. इथूनच त्यांच्या सुंदर आणि अर्थपूर्ण मैत्रीची सुरुवात होते. पण मैत्रीचे हे नाते कसे पुढे जाते, त्यात कशी वळणे येतात हे सर्व सांगणारी सुंदर कथा म्हणजे हा चित्रपट. तेव्हा आता सोनाली, सिद्धार्थ यांच्या साथीने सचिन कुंडलकर यांच्या ‘गुलाबजाम’ला प्रेक्षकांची पसंती मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 5:18 pm

Web Title: marathi actor siddharth chandekar actress sonali kulkarni starrer upcoming marathi movie gulabjaam teaser video sachin kundalkar
Next Stories
1 अभिनेत्री चारु रोहतगी यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन
2 नवरा असावा तर असा : नम्रता आवटे आणि विशाखा सुभेदारसोबत रंगला मकरसंक्रांत विशेष भाग
3 ..अन् सई-अमृता आल्या एकत्र!
Just Now!
X