एकटय़ाने केलेला प्रवास हा एक प्रकारचा आत्मशोध असतो. अभिनेत्री प्रिया बापटने तो घेतला आणि तिला स्वत:ची नव्यानेच ओळख झाली. ही सगळी प्रक्रिया तिने खास ‘लोकप्रभा’च्या वाचकांशी शेअर केली आहे.

‘आम्ही ट्रॅव्हलकर’ हा ट्रॅव्हल शो करताना फिरण्याची आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या देशांत वेगवेगळी माणसं भेटली, त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि मुंबई, महाराष्ट्र, खरं तर दादर सोडून कितीतरी वेगळं जग अस्तित्वात आहे याची जाणीव झाली. या ट्रॅव्हल शो दरम्यान लेखिका म्हणून ओळख झाली आणि नंतर मैत्री झाली ती, आदिती मोघेशी. साधारण फॅब इंडिया, आजीचा बटवा, हिप्पी लोक या सर्वाचं एकत्रित संयोजन म्हणजे आदिती. मूळची वसईची, राहते मुंबईत पण पक्की पुणेरी वाटेल अशी. आदितीचा उल्लेख केला, कारण ती आहे फिरण्यासाठी, प्रवास करण्यासाठी मला प्रोत्साहन देणारी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती. आमच्या ट्रॅव्हल शो दरम्यान तिच्या सोलो ट्रिपच्या गोष्टी ऐकल्या आणि वाटलं यार! किती भारी आहे ना हे! म्हणजे, मी कायमच स्वत:त रमले, एकटी पुस्तकं, कॉफी एन्जॉय करते, पण ते माझ्या शहरात, माझ्या घराजवळ. आपलं घर सोडून, दुसऱ्या राज्यात, नवी भाषा, कदाचित येणारी – कदाचित न येणारी. अशा ठिकाणी प्रवास करणं किती कमाल असेल. पण फक्त विचारच. नियोजन करायला कधी धजावले नाही. ‘वजनदार’ चित्रपटाच्या जाहिरातीच्या निमित्ताने कल्याणीशी मैत्री झाली. मॅकलॉइड गंज, धरमशाला, इकडचे तिचे प्रवासाचे किस्से ऐकले आणि माझ्यातला प्रवासी होण्याचा किडा पुन्हा वळवळला. पण या वेळी मात्र हा विचार पूर्णत्वाला नेण्याचं मी ठरवलं. खूप चर्चा, खूप अभ्यास करून शेवटी माझी पहिली ‘सोलो ट्रिप’ मी पाँडेचरीला करायचं ठरवलं.

५ डिसेंबर २०१६ ही तारीख ठरली. विमानाचं आणि हॉटेलचं बुकिंग झालं. खूप साऱ्या उत्साहाने, खूप साऱ्या नोट्स काढून, तयारी करून ४ डिसेंबरला रात्री बॅग भरली. माझं आय पॅड, ब्ल्यूटूथ स्पीकर, हेडफोन्स, पुस्तकं अािण कपडे. उद्या जाण्याच्या आनंदाने रात्री झोप लागत नव्हती. कधी झोपले कळलंच नाही. पण उठले ते एका एसएमएसने. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती गंभीर होती आणि त्यामुळे त्यांचे समर्थक, कार्यकर्ते यांनी रस्त्यावर येण्यास सुरुवात केली होती. संपूर्ण तामिळनाडू राज्य त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करत होतं. तिकडची परिस्थिती आणि लोकांची मानसिकता लक्षात घेता, काही तरी होईल, चेन्नई बंद पडेल, दगडफेक होईल, या सगळ्या विचारांनी, भीतीने, काळजीने घेरलं. आणि मी विमानतळावर गेलेच नाही. भरलेली बॅग उपसून सगळं सामान परत कपाटात ठेवलं. मध्ये दोन आठवडे खूप उलथापालथ झाल्यावर मी पुन्हा एकदा ट्रिप ठरवण्याच्या मूडमध्ये आले. सगळे तेव्हाच म्हणत होते, एवढं ठरवलं आहेस तर जागा बदल आणि जा.. पण माझी पहिली सोलो ट्रिप पाँडिचेरीलाच करायची हे माझं ठरलं होतं.

थोडं संशोधन करताना काही तरी वेगळा आपलेपणा वाटत होता या जागेबद्दल. आणि प्रवासात मला सगळ्यात जास्त मोहीत करणारी गोष्ट म्हणजे कॅफे. ते तर जवळपास पाँडिचेरीच्या संस्कृतीचा एक भागच होते. पुन्हा एकदा तिकिटं बुक केली आणि २५ डिसेंबरला पाँडिचेरीला रवाना झाले. चेन्नई विमानतळावर पोहोचले. हॉटेलशी आधीच बोलणं झालेलं असल्याने ड्रायव्हर मला नेण्यासाठी आला. प्रवास करताना मला जाणवलेली गोष्ट म्हणजे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रवास हा लवकर आणि सुखकर असावा (त्यात वेळ घालवू नये.). आणि तसा तो सुखकर झालासुद्धा. विजय नावाचा माझा ड्रायव्हर होता. प्रवासाने आणि पहाटेचं विमान असल्याने मी गाडीत जरा झोपले किंवा शांत बसले तर तो खट्ट व्हायचा. माझ्या बडबडीला जोरदार स्पर्धा देणारा विजय! आमच्या गप्पांमधून त्याला जेव्हा कळलं की मी अभिनेत्री आहे, तेव्हा तो गाडीत उडय़ा मारायचा बाकी राहिला होता. ‘वॉव.. सेलेब्रिटी इन माय कार.. आय अ‍ॅम व्हेरी हॅपी.’ त्याला जमेल तशा इंग्लिशमध्ये त्याने त्याला झालेला आनंद व्यक्त केला. आणि मग मुद्दाम मला रस्त्यात दिसणारे दक्षिणेच्या सुपरस्टारचे बंगले दाखवू लागला. इतकंच नाही तर मी बुचडा करून वर बांधलेले केस मोकळे सोडल्यावर खूप खूश झाला. माझ्या मनात मात्र शंभर विचार आले. असा काय हा? मी उगाच जास्त गप्पा मारतेय का? पासून ते सगळेच लोक वाईट नसतात, कोणालाही असं जज करण्यापूर्वी जरा वेळ जाऊ द्यावा इथपर्यंत. पण खरं सांगू? त्याचा हाच साधेपणा मला भावला होता.

दोन-अडीच तासांच्या छान संगीतमय प्रवासानंतर मी हॉटेलमध्ये पोहोचले. वाटेत खूप सारी तमिळ गाणी ऐकली. आपण ज्या राज्यात आहोत त्याच भाषेतील संगीत ऐकण्याचा माझा उगाच एक हट्ट. हॉटेलमध्ये चेक इन केलं, थोडा आराम केला आणि माझ्या ऑरोवीलच्या प्रवासासाठी एक रिक्षा बोलावली. आजपासून हीच माझी सफारी. पिक अप आणि ड्रॉप सेवा. इश्वरम असं माझ्या रिक्षावाल्याचं नाव होतं आणि खरं तर ईश्वरम माझा पाँडिचेरीमधला पहिला मित्र. तो मला ‘मा’ किंवा ‘अम्मा’ म्हणायचा. आणि जणू काही मी त्याची जबाबदारी आहे अशी काळजी करायचा. इश्वरमने मला ऑरोवीलच्या व्हिजिटिंग सेंटरला सोडले. तिथे जाऊन थोडी चौकशी करून माझ्या ट्रिपची सुरुवात झाली.

खरं सांगू? पहिल्या दिवशी मी ऑरोवीलचा परिसर पाहिला, मातृमंदिर बाहेरून पाहिलं पण माझं संपूर्ण लक्ष स्वत:ला सांभाळण्यात, आपल्याकडे कोणी पहात नाही ना याचा विचार करण्यात गेलं. मी जे समोर बघत होते ते मी पूर्ण लक्ष देऊन एन्जॉयच करत नव्हते. एखाद्या ठिकाणी आपण नवीन आहोत, आपल्याला इथली माहिती नाही, आणि ती करून घेण्यासाठी आपण एकटेच आहोत, ही जाणीव सतत माझ्याबरोबर होती. मला एकटीने प्रवास करायची भीती वाटायची, कारण एकच विचार मला त्रास द्यायचा. कोणी मला पळवून नेलं आणि काही केलं तर? याचमुळे कदाचित पहिला दिवस माझा स्वत:ला सावरण्यात आणि माझी सुरक्षितता पाहण्यात गेला.
दुसऱ्या दिवशी मात्र मी या शहरात एकदम सेट झाले. सकाळी लवकर उठून ऑरोवीलला गेले. त्या दिवशी माझी ऑरोवीलशी खरी ओळख झाली असं म्हणायला हरकत नाही. श्री अरबिंदो यांचं तत्त्वज्ञान मानणारं आणि त्यांच्या विचारांवर आधारित एक युनिव्हर्सल टाऊनशिप म्हणजे ऑरोवील. तमिळ, संस्कृत, फ्रेंच, इंग्लिश या चार भाषांमध्ये  इथे संवाद साधला जातो. शांतता आणि सुसंवाद साधण्यासाठी जगभरातून लोक इथे येऊन स्थायिक होतात. उपजीविकेसाठी ऑरोवीलमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. कागद बनविणे, जंगलसंवर्धन, मडकी किंवा मातीच्या वस्तू बनवणे आणि इतरही अनेक.

आजचा संपूर्ण दिवस हा परिसर अनुभवायचा असं ठरवलं. व्हिजिटिंग सेंटरजवळ एका कॅफे शेजारी सायकल भाडय़ाने मिळत होती. मी त्यांच्याकडे गेले, पैसे दिले, पण मला हवी तशी, माझ्या मापाची सायकल नव्हती म्हणून थांबले. उगाच इकडेतिकडे भटकले, आणि अध्र्या तासाने पुन्हा चौकशी केली. अरे! मी दिवसभर त्या सायकलवर भटकणार तर ती सायकल धष्टपुष्ट नको का? गंजलेली, आजारी दिसणारी सायकल नकोच होती मला. आणि माझी थांबायची तयारीसुद्धा होती. माझं तिथलं घुटमळणं पाहून तिकडच्या अम्मापर्यंत माझी ओढ पोहोचली बहुतेक. तिने प्रयत्नपूर्वक माझ्यासाठी एक चांगली सायकल राखून ठेवली. मी फारच खूश झाले. सायकल घेतली आणि निघाले. पण इतक्या सहजपणे एखाद्या गोष्टीचा आनंद घेता आला, तर त्याची किंमत कशी कळणार? मी बाहेर येतानाच त्या सायकलची चेन निघाली आणि चाकात अडकली. आता हे कुठे दुरुस्त करता येत होतं मला! मी कोणी मदत करू शकेल का ते शोधू लागले. व्हिजिटिंग सेंटरच्या पार्किंग एरियामध्ये जवळजवळ एक परदेशी माणूस दिसला. मी त्याला विनंती केली अणि एका क्षणाचाही विलंब न करता तो लगेच मदतीला तयार झाला. त्याने काय झालंय ते नीट बघितलं. सायकल वाकडी केली, आणि चेन सोडवली. पण सोडवली म्हणजे आता ती पूर्णच बाहेर आली! झाली का पंचाईत. आता याचं काय करायचं? तो म्हणाला  हे नाही दुरुस्त होणारं. सायकल आत्ताच भाडय़ाने घेतली असेल तर परत करा. पण माझी आता ही सायकल परत करण्याची इच्छा नव्हती. मी त्याला विनंती केली, एक शेवटचा प्रयत्न करू, नाही झालं तर बघू. तोही बिचारा माझा केविलवाणा चेहरा बघून तयार झाला. त्याने चेन सोडवली आणि पुन्हा त्या आकडय़ांमध्ये गुंफू लागला. पाच मिनिटांच्या प्रयत्नानंतर अखेरीस ती चेन बसली. आणि सायकल पूर्ववत झाली. मी तिथेच एक छोटी चक्कर मारून बघितली आणि त्याला खूप खूप धन्यवाद म्हटलं. आणि ऐटीत पेडल मारून माझ्या प्रवासाला सुरुवात केली.

मातीचा रस्ता, दोन्ही बाजूला झाडं आणि सोबतीला माझ्यासारखे सायकलवर टांग मारून फिरायला निघालेले वेगवेगळ्या देशांतले, वेगवेगळी भाषा बोलणारे माझे प्रवासी मित्र. ऑरोवीलच्या रस्त्यावर सायकलने फिरण्याचा आनंद वेगळाच होता. फिरत फिरत, नवे रस्ते शोधत, नव्या गल्ल्या पहात मी एका चौकात येऊन थांबले. त्या चौकातील तीन रस्ते डांबरी होते आणि एकच समोर जाणारा रस्ता मातीचा होता. अर्थातच मी तोच रस्ता निवडण्याचं ठरवलं. एरवी चौकात माहितीचे बोर्ड होते पण या चौकात तसं काही दिसत नव्हतं. नजर जाईल तिथपर्यंत समोर मातीचा रस्ता दिसत होता. पेडल मारलं आणि त्या रस्त्याच्या दिशेने निघाले. सायकल चालवताना आमच्या फिटनेसच्या परुळेकर सरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आठवत राहिली. सायकलिस्टने नजर समोर पण कान मात्र पूर्ण उघडे ठेवावे लागतात. आपल्या मागून येणाऱ्या गाडय़ांचा आवाजानेच अंदाज घ्यावा लागतो. मनात इतर विचार न येऊ देता, पूर्ण शांततेने अािण एकाग्रतेने सायकलच्या तालाशी एकरूप होऊन जायचं. आता मी, माझे हृदयाचे ठोके अािण सायकलच्या चाकाचा लूप एका तालामध्ये होतो. त्या न संपणाऱ्या मातीच्या रस्त्यावर. जिथे बाजूला मोकळं माळरान आणि मध्येच फुलझाडं होती. थोडय़ा वेळाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं दिसू लागली. असं वाटलं, डोक्यावरचं ऊन जसं वाढलं तसं निसर्गाने आपोआप आपल्या सावलीची सोय केली. दोन मिनिटं तसंच पुढे चालल्यावर अचानक छान सुगंध आला आणि मी थांबले. मातीच्या रस्त्याबाजूला मोगरा आणि जाईची झाडं होती. डोक्यावर सूर्य तळपत असला तरी त्याची झळ पोहोचणार नाही याची काळजी झाडांनी घेतली, उकाडय़ाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या सावलीत, गारव्यात मला सामावून घेतलं. आणि माझा अनुभव अजून स्पेशल करण्यासाठी सर्वत्र माती आणि मोगऱ्याचा गंध पसरला होता. काही वेळ सायकल बाजूला लावून मी तिथेच थांबले. तो गंध श्वासात भरून घेतला. डोळे मिटले आणि आपोआप चेहऱ्यावर हसू आलं. मनातल्या मनात या खूप स्पेशल अनुभवाबद्दल धन्यवाद म्हटलं आणि निघाले.

ऑरोवीलचे रस्ते फिरून झाले, ऊन उतरू लागले. मी सायकल व्हिझिटिंग सेंटरला परत दिली आणि ईश्वरमला बोलावलं. तिथून निघाले आणि थेट सेरेनिटी बीचवर गेले. मला समुद्र कायमच खूप आकर्षित करतो. पाण्याशी, पावसाशी माझं वेगळं नातं आहे असं वाटतं. पाणी, त्याची स्थिरता, लाटांचा उथळपणा, किनाऱ्याकडे धावण्याची ओढ आणि परत मागे फिरण्याची घाई. समुद्र आपल्याला खूप काही शिकवतो असं मला वाटतं. मी बीचवर पोहोचले. तिथल्या खडकांवर जाऊन शांत बसले. सिनेमा आणि नाटकांचा आपल्यावर किती परिणाम झालाय हे तेव्हा कळलं. तिथे पोहोचल्यावर मला वाटलं, आता मी सिनेमातल्या पात्रांसारखी शांत उभी राहणार, आयुष्याचा विचार करणार, दु:ख समुद्रात फेकून देणार अािण नव्याने उभारी घेणार. बापरे! किती तो फिल्मीपणा. जितकी संहिता मी मनात लिहीत होते, त्यातलं खरं तर काहीच घडलं नाही. मी त्या दगडांवर शांत बसले फक्त. समुद्राचा आवाज ऐकत, दगडावर आदळणाऱ्या लाटा पाहात. आज तर मला तो निळा आहे की हिरवा हेसुद्धा नीट दिसत नव्हतं. मी फक्त त्याचं अस्तित्व आणि माझं तिथे असणं अनुभवत होते.

आपलं मनसुद्धा या लाटांसारखंच असतं. सतत कशाच्या तरी ओढीने धावणारं आणि हाती लागताच मागे फिरणारं. पाण्याची किंवा समुद्राची वेगवेगळी रूपं मला माझ्या स्वभावासारखी वाटतात. कधी शांत, कधी भयंकर खवळलेला, कधी स्वच्छ पारदर्शी तर कधी तळाचा थांगच न लागू देणारा. खूप वेळ शांतपणे फक्त समुद्राचा आवाज ऐकत बसून रहिले. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला, जवळच्याच एका कॅफेमध्ये बसून सूर्यास्त अनुभवत कॉफी प्यायले. पॅनकेकवर  मेपल सिरप घालून छान खाल्लं. स्वत:चे इतके लाड केल्याचं मलाच कौतुक वाटलं. ईश्वरमला बोलावून थेट हॉटेल गाठलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाँडिचेरी शहर बघायला बाहेर पडले. फ्रेंच कॉलनी असल्यामुळे इथल्या बिल्डिंग्स, ऑफिसर्सचे जुने बंगले, घरं या सगळ्यावर फ्रेंच वास्तुशास्त्रज्ञाचा प्रभाव दिसतो. तामिळनाडूमध्ये एक गोष्ट जाणवली. तुम्ही गरीब असा की श्रीमंत, घर छोटं असो की बंगला असो, प्रत्येक घराबाहेर रांगोळी असतेच. फ्रेंच कॉलनी, छोटे रस्ते, बैठी घरं आणि घराबाहेर रांगोळी हे वातावरण फारच प्रसन्न करणारं होतं.

ट्रॅव्हल कंपन्या जसं फिरवतात, तसं नुसतं यादीचा पाठपुरावा करण्यात मला अजिबात रस नव्हता. मी पाँडिचेरीत काय पाहिलं हे लोकांना सांगण्यापेक्षा, मी जे पाहतेय त्याचा पूर्ण अनुभव घेणं मला जास्त आवडतं. पॅरिसला जाऊन आयफेल टॉवर नाही पाहिला तरी काही हरकत नाही. मुळात आपण ज्या ठिकाणी जात आहोत, तिकडची फक्त लोकप्रिय पर्यटनस्थळे हा काही त्या जागेचा आत्मा नाही. फिरायचं असेल, तिथली संस्कृती समजून घ्यायची असेल आणि त्या जागेशी मैत्री करायची असेल. तर लोकप्रिय जागा सोडून थोडं आत डोकावून पाहायला लागतं. त्यामुळे पाँडिचेरीला येऊन गणेश मंदिर पाहिलं का? आश्रम पाहिला का? चर्च पाहिलं का? या पलीकडे जाऊन रस्त्यांवर चालत फिरणं, इकडच्या माणसांशी मैत्री करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, इकडचे कॅफे जे या संस्कृतीचा भाग आहेत त्याचा अनुभव घेणं मला जास्त आवडतं.

सकाळी अकरा साडेअकराची वेळ होती. फारसं ऊनही नव्हतं. त्या छोटय़ा गल्ल्यांमधून चालत फिरताना एक छान कॅफे दिसला. ‘आर्टिका कॅफे गॅलरी’. दोन्ही बाजूला केळीचे खांब उभारून मुख्य रस्त्यावरून १०-१२ पावलं आत जाण्याचा सुंदर पादचारी मार्ग तयार केला होता. कॅफे गॅलरी ही संकल्पना मी पहिल्यांदाच पाहात होते. त्या कॅफेच्या प्रत्येक भिंतीवर सुरेख पेंटिंग केली होती. टॉयलेटचा दरवाजासुद्धा रंगवला होता. पांढरा शुभ्र कॅफे, छोटी पांढरी टेबलं, खुच्र्या, एका बाजूला मोठय़ा ग्रुपसाठी बसायला लाकडी सोफा आणि त्याच्यामागे दोन खोल्या. एका खोलीत फॅमिली रुम आणि दुसऱ्या खोलीत कलादालन. तिथे वेगवेगळ्या वस्तू विकायला ठेवलेल्या. पोस्टकार्ड, चित्र, टी-शर्ट्स, पुस्तकं बरंच काही.

मी आत गेले. सगळीकडे नजर फिरवली आणि झाडाखालचं एक पांढरं टेबल हेरलं. ही आपली जागा, असं म्हणत बॅग ठेवली. एक कप कॉफी आणि क्रोईसंट ऑर्डर केलं. आणि सॅकमधून माझं पुस्तक बाहेर काढलं. माझ्यासारखंच हातात पुस्तक घेऊन दोन-तीन जणं तिथे बसली होती. काही मित्र-मैत्रिणींचे ग्रुप होते. काही जोडपी होती. पण तरीही सगळं शांत. त्या जागेची शांत आणि प्रसन्नता कोणीच भंग करत नव्हतं. प्रत्येक जण आपापला आनंद घेण्यात मग्न होते. मी पुस्तक उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. मुराकामी या जपानी लेखकाचं ‘काफ्का ऑन द शोर’ हे इंग्रजी अनुवादित पुस्तक मी वाचत होते. ते पुस्तकही मला अशा वळणावर नेत होतं जिथे हातातून ते खाली ठेवण्याचा मोह होत नव्हता. कॉफी झाली, क्रोईसंट आला. एकीकडे खात, दुसरीकडे डोकं पुस्तकात घालून मी किती तास तिथेच बसले याचा अंदाजच मला नव्हता. अचानक थोडय़ा वेळाने घडय़ाळ पाहिलं तर दुपारचे साडेतीन झाले होते.

एकाच जागी असं चार तास वाचत बसण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. ती जागा तशी होती की पुस्तक तसं होतं माहीत नाही. पण हे नव्याने तयार झालेलं जग सोडून दुसरीकडे जावंसंच वाटत नव्हतं. मी तिथेच बसले, जेवले. माझ्यासारखंच वाचत बसलेल्या एका कॅनेडिअन मुलाशी ओळख झाली. तो हिंदू धर्मावर पीएच.डी. करत होता. कॅनडा युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होता. त्याच्याशी गप्पा मारताना स्वत:ची थोडी लाज वाटली. माझ्या देशाबद्दल, माझ्या संस्कृतीबद्दल माझ्यापेक्षा खूप जास्त अभ्यास त्याचा होता. रामायण आणि महाभारताविषयी तो भरभरून बोलत होता. हिंदू संस्कृतीबद्दल त्याला एवढं आत्मीयतेने बोलताना पाहून मला खूप छान वाटलं. तिथेच स्कॉटलंडहून आलेलं एक जोडपं भेटलं. त्यांचा फोटो काढण्याच्या निमित्ताने बोलायला सुरुवात झाली आणि गप्पा रंगत गेल्या.
मेघालय आणि पाँडिचेरीच्या प्रवासामधला हा महत्त्वाचा फरक मला जाणवला. मेघालयात फार सुंदर निसर्ग अनुभवला. खूप वेगवेगळी रूपं पाहिली. आणि पाँडिचेरीमध्ये मी माणसं अनुभवली. खूप नवे मित्र जोडले. त्या त्या जागी आपल्याला भेटलेली माणसं, त्यांच्याशी झालेला संवाद, तुम्हाला माणूस म्हणून खूप शिकवून जातो. एरवी रस्त्यातून चालताना कोणाशी कशाला बोलायचं? ते काय म्हणतील? हा सगळा ‘मी’पणा इथे गळून पडला. मला बदलवणारी, शिकवणारी, मला पेचात पाडणारी आणि माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला पाँडिचेरीत भेटली. हा या ट्रिपने मला दिलेला अनमोल ठेवा.

त्यातला मौल्यवान ठेवा म्हणजे राजा. नावाप्रमाणेच मनाचा राजा. मुंबईतल्या माझ्या एका मित्राने मी पाँडिचेरीला जाणार म्हटल्यावर राजाचा नंबर मला आधीच दिला होता. राजा हा माझ्या मित्राचा मित्र. ऑरोवीलमध्येच जन्माला आलेला. दिसायला रांगडा पण मनाने हळवा. राजा खरंच फुल ऑफ लाइफ व्यक्तिमत्त्व आहे. ऑरोवीलमधल्या कॅफेत माझी राजाशी पहिली भेट झाली. भेटताच क्षणी त्याच्या उत्साह आणि प्रचंड एनर्जीने मी भारावून गेले. भेटल्या क्षणापासून त्याची गडबड सुरू झाली. आणि पहिल्याच भेटीत आम्ही दोस्त झालो. या भेटीत राजा बोलत होता आणि मी ऐकत होते. त्याला त्याच्या जन्माचं वर्षच माहीत नव्हतं. मी विचारलं कसं काय? तर म्हणाला ‘‘माझ्या वडिलांनी आम्हा भावंडांची जन्मतारीख घराच्या भिंतीवर लिहून ठेवली होती. आम्ही समुद्राजवळ राहायचो. एक दिवस चक्रीवादळ आलं, त्यात घर वाहून गेलं. ती भिंतपण गेली. त्यामुळे जन्मतारखेचा पुरावा गेला.’’ हे सगळं सांगताना राजा हसत होता. आणि मी खोटं हसण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या आयुष्यातली एवढी मोठी घटना त्याने अशी पटकन सांगून टाकली. हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर जराही दु:ख नव्हतं. आपण जे गमावलंय त्यापेक्षा जे आहे त्यात तो खूप समाधानी होता.

राजाचं एक छोटंसं मातीचं घर आहे. त्याला त्याच्या घरामागच्या जागेत डान्स स्टुडिओ बांधायचाय. डान्स हा राजाचा जीव की प्राण. ऑरोवीलमध्ये तो सालसा शिकला आणि बंगलोरला कण्टेम्पररी डान्स. आता जबाबदाऱ्यांमुळे डान्स मागे पडण्याचं दु:खं त्याच्या चेहऱ्यावर जास्त दिसतं. दुपारी ऑरोवीलच्या सोलार किचनमध्ये मस्तपैकी जेवलो. आणि राजा मला तो मॅनेजर असलेलं गेस्ट हाऊस दाखवायला घेऊन गेला. तिथे गेल्या क्षणी पाच मिनिटांत माझी सगळ्यांशी मैत्री झाली. भारतीय, फ्रेंच, नेदरलॅण्ड अशा वेगवेगळ्या देशांतले, वेगवेगळ्या वयोगटांतले माझे नवे मित्र.

सगळ्यांनी आपापल्या बाइक काढल्या. मी राजाच्या बाइकवर बसले. आणि ते मला थेट घेऊन आले ऑरोविलच्या युनिटी पॅव्हेलियन हॉलमध्ये. इथे फाइव्ह ऱ्हिदम वेव्ह डान्स वर्कशॉपचा ओरिंटेशन दिवस होता. ओरिंटेशन म्हणजे पुढे आठ दिवसांच्या कार्यशाळेमध्ये नक्की काय होणार याची झलक. डान्स आणि राजा हे कॉम्बिनेशन माझ्याबरोबर होतं. राजाने मला विचारलं आणि काही तरी वेगळं पाहायला मिळेल म्हणून मीही होकार दिला.

आम्ही आत गेलो. आणि समोर जे पाहिलं ते बघून जागीच थांबले. फाइव्ह ऱ्हिदम वेव्ह म्हणजे नेमकं काय याचा अंदाज मी घेत होते. त्या हॉलमध्ये खूप जण होते, पण तरीही गर्दी नव्हती. तिथल इन्स्ट्रक्टर सांगतील तसं त्या संगीतावर लोक ताल धरत होते. मी थोडीशी बिचकत कोपऱ्यात उभी राहिले. पाहात होते. त्या हॉलमधली सर्व माणसं एक तर स्वत:त हरवलेली किंवा स्वत:ला शोधणारी. मी थोडी अवघडले. मी स्वत:ला असं झोकून दिलं, तर कशी दिसेन? लोक हसतील? अशा ‘मी’ पणाच्या विचारांनी मला अडवून ठेवलं होतं. माझ्या डोळ्यांसमोर ताल धरणाऱ्या माणसांना खरंच इतकं हलकं वाटलं होतं की सगळेच देखावा करत होते? काही कळत नव्हतं. राजा मात्र कधीच त्यातला एक भाग झाला होता. मी डोळे मिटले. विचार केला. कोणी हसलं तर काय होईल? काही नाही. कोणी वेडं म्हणालं तर काय होईल? काही नाही. पण जर मी गेलेच नाही, तर काही तरी अनुभवायचं राहून गेलं याची खंत मनात राहील. मी डोळे उघडले आणि शांतपणे जाऊन त्या गर्दीत उभी राहिले.

‘फाइव्ह ऱ्हिदम इज अ मूव्हमेंट मेडिटेशन प्रॅक्टिस. इट इज टू पुट अ बॉडी इन मोशन इन ऑर्डर टू स्टिल द माइण्ड’.

डोक्यापासून, पायापर्यंत शरीराच्या प्रत्येक भागाचं अस्तित्व जाणवून घ्यायचं. प्रत्येक अवयवाची मनाशी सांगड घालायची. मी डोळे मिटून घेतले आणि त्या संगीताच्या तालावर स्वत:ला मोकळं सोडलं. माझ्या शरीराचा प्रत्येक भाग हा त्या संगीताला प्रतिसाद देत होता. थोडय़ाच वेळात माझं स्वत:वरचं लक्ष उडून गेलं आणि मीसुद्धा त्या गर्दीचा एक भाग झाले. अनेक वर्षांचं डोक्यावरचं कसलं तरी ओझं खाली गळून पडलं. शरीर हलकं झालं होतं, पण त्यातलं त्राण गेलं नव्हतं. माझं मन आणि शरीर एकमेकांपासून वेगळे झाले होते. मी कशी एकरूप झाले माहीत नाही. पण असं वाटत होतं की, माझं मन शेवरीसारखं उडून शरीराबाहेर आलंय. आणि लांबून माझ्याकडे बघतंय. कुठलंही दडपण नाही, चिंता नाही. छान हवेत तरंगतंय. आपण एक ऊर्जेचा स्रोत आहोत फक्त. आणि जर ही सगळी ऊर्जा आपल्या शरीरातून बाहेर पडली तर उरेल फक्त रिकामं शरीर.

हवेत उंच उडणाऱ्या माझ्या मनाला मी अलगद परत बोलावलं. शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या ऊर्जेची पुन्हा जाणीव करून दिली. मन आणि शरीर पुन्हा एकरूप झालं आणि मी डोळे उघडले. गेले दोन-अडीच तास माझ्याबरोबर काय झालं याचा खरंच अंदाज येत नव्हता. माझ्या डोळ्यातून फक्त पाणी येत होतं. आत्मा, देव आहे की नाही माहीत नाही. पण ऊर्जा मात्र नक्की आहे. वेगवेगळ्या स्वरूपातली. आपल्या शरीरातही भयंकर ऊर्जा आहे, फक्त तिचा योग्य वापर करायला हवा. या अशा अनुभवानंतर तुमचा अहंकार गळून पडतो. तुम्ही शांत होता. मी शांत झाले.

काही प्रवासात तुम्हाला विशिष्ट जागा सापडतात, काही प्रवासात माणसं भेटतात, तर काही प्रवासात तुम्ही स्वत:ला भेटता. पाँडिचेरीच्या या प्रवासात मी खूप माणसांना भेटले आणि प्रत्येक वेळी त्यांच्याकडून काही तरी शिकून स्वत:त सामावून घेतलं. विजयपासून राजापर्यंत सर्वानी मला भरभरून दिलं. पुस्तकंही शिकवत नाही इतकंतुम्हाला प्रवास शिकवतो. पाँडिचेरीत माझे सगळे संकोच गळून पडले. माझ्यातल्या अनेक कमीपणांवर मी मात केली. काही तरी गोष्टी नव्याने जपायला शिकले. काही गोष्टी सोडून द्यायला शिकले. माझ्या शरीराची आणि जगण्याची किंमत कळली. स्वत:चा आतला आवाज ऐकू लागले. आणि त्यावर विश्वास ठेवायला शिकले. माणसांशी मैत्री करायला शिकते.

माझं मन आता खूप शांत आणि मोकळं आहे. माझं शरीर हे फक्तत्याचं घर आहे. या घरातून त्याला मोकळं सोडायला शिकले. आणि ते परतण्याची वाट पाहायला शिकले. आता खरं तर प्रवास करणं ही फक्त माझी आवड नाही तर माणूस म्हणून ती माझी गरज आहे.

response.lokprabha@expressindia.com
@bapat_priya
सौजन्य – लोकप्रभा