मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजपर्यंत विविध विषय हाताळले गेले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटांची यादी पाहायला गेलं तर त्यात विविध आशयाचे आणि नव्या धाटणीचे चित्रपट पाहायला मिळतील. याच यादीमध्ये अलिकडेच झॉलीवूड या चित्रपटाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने केवळ देशातच नाही तर सातासमुद्रापार आपला डंका वाजविला आहे. या चित्रपटाला स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड मिळाला आहे.

विदर्भात प्रचंड लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी या नाटकाच्या खास प्रकारावर आधारित ‘झॉलीवूड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन तृषांत इंगळे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला फ्रान्समधील इंडियन फेस्टिव्हल ऑफ तौलौसमध्ये स्पेशल ज्युरी अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे.

दरम्यान, दिग्दर्शक तृषांत इंगळे यांनी स्वत: झाडीपट्टी या नाटकात बाल कलाकार म्हणून काम केलं आहे. त्यामुळेच हा नाट्यप्रकार विदर्भाव्यतिरिक्त अन्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी झॉलीवूडची निर्मिती केली. झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहे. पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. या प्रकारावर पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती होत आहे. चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या हेतुने तृषांतनं १६व्या वर्षी मुंबई गाठली. त्यानंतर लेखन, कास्टिंग डिरेक्शनचा अनुभव घेत आता “झॉलीवूड” या चित्रपटाच्या रुपानं त्यानं पहिला चित्रपट दिग्दर्शित केला आहे.