सध्याच्या धावपळीच्या काळात सहजीवनाची वाट चुकलेल्या जोडप्याची गोष्ट असलेला ‘अनुराग’ हा आगामी चित्रपट लंडनमध्ये झळकला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर परदेशात त्याची स्क्रीनिंग करण्याचा ट्रेंड असताना प्रदर्शित  होण्यापूर्वीच परदेशातून अनुरागवर पसंतीची मोहोर उमटली आहे. त्यामुळे आता ‘अनुराग’विषयी  कुतूहल निर्माण झाले आहे.
लंडनच्या महाराष्ट्र मंडळात अनुरागची तीन स्क्रीनिंग करण्यात आली. त्यात स्लोव्ह येथील महाराष्ट मंडळ, ईस्ट हॅम बोलीन सिनेमा आणि लंडनमधील सर्वांत जुन्या वेम्बली महाराष्ट्र मंडळ येथे चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले. निखिल देशपांडे, सुशील रापतवार, प्रतिक शेलार, स्वप्नील कुलकर्णी यांनी या स्क्रीनिंगचे आयोजन केले होते.  खास या स्क्रीनिंगसाठी अभिनेत्री आणि प्रस्तुतकर्ती मृण्मयी देशपांडे, लेखक-दिग्दर्शक डॉ. अंबरिश दरक आणि छायालेखक सुरेश देशमाने उपस्थित होते.
चित्रपट पाहून भारावलेल्या लंडनमधील मराठीजनांसह अमराठी चित्रपटप्रेमींनीही हळवे कथानक, मृण्मयी आणि धर्मेंद्र गोहिल यांचा अभिनय, लेह-लडाखच्या अप्रतिम चित्रीकरणाचे कौतुक केले. ‘आयुष्याच्या एका टप्प्यावर नात्यात आलेला तोचतोचपणा सहजीवनाचा आनंद हिरावतो. मात्र, ‘अनुराग’नं नात्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन दिला,’ अशा शब्दांत लंडनवासियांनी चित्रपटाचं कौतुक केलं.
आरआरपी कॉर्पोरेशन लिमिटेडची निर्मिती असलेला हा चित्रपट मृण्मयी देशपांडे क्रिएशन्सने प्रस्तुत केला आहे. लंडननंतर आता जर्मनीमध्येही चित्रपटाची स्क्रीनिंग करण्यात येणार आहेत.