‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या नावाप्रमाणे हा चित्रपट घट्ट मैत्रीचा असेल असा आपला कयास असतो. चित्रपटाच्या सुरुवातीलाच तो संगीतमय चित्रपट आहे, अशी सूचना दिली जाते. आणि आपल्याला महाविद्यालयाच्या आवारात एका रॉकबॅण्डचे सादरीकरणही दिसते. चित्रपटातील सगळ्या व्यक्तिरेखांची पुरती तोंडओळख होण्याआधीच ते आपल्याला त्या गाण्याच्या फ्रेममध्ये नाचताना दिसतात. त्यामुळे साहजिकच या विषयावर येऊन गेलेल्या अनेक हिंदी चित्रपटांप्रमाणे इथेही मुलांसमोर नाचणारी त्यांची शिक्षिकाच असेल हा प्रेक्षकांचा अंदाज अगदीच चुकत नाही. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘एफ.यू.’ हा चित्रपट ना त्या मुलांच्या मैत्रीशी आपल्याला जोडतो ना त्यातली गाणी आपल्याला संगीतमय कथा ऐकवतात. अनेक वेगवेगळ्या कथा आणि व्यक्तिरेखांचा एक चकचकीत कोलाज तेवढा आपल्यासमोर उलगडत जातो.

एकीकडे मराठी चित्रपटांमध्ये महाविद्यालयीन विश्वातील तरुणाई, त्यांचे जगणे याची परिभाषा वेगवेगळ्या पद्धतीने उमटताना दिसते. ‘क्लासमेट’ असेल किंवा सुजय डहाके दिग्दर्शित ‘फुंतरू’ असेल या चित्रपटातून तरुण पिढीचे वागणे-बोलणे, त्यांचे सतत धावणारे विचार, पहिल्या नजरेतले प्रेम, महाविद्यालयात येणारी नवीन, श्रीमंत मुलगी, मग प्रपोज, प्रेम आणि प्रेमभंग या गोष्टींचे दर्शन घडते. ‘एफ.यू.’मध्येही श्रीमंत महाविद्यालयात शिकणाऱ्या या तरुणांची तशीच कथा आहे पण कित्येकदा ती अतार्किक किंवा ओढूनताणून मांडल्यासारखी वाटते. वर म्हटले तसे चित्रपटाच्या सुरुवातीला रॉकबॅण्डमधून एकत्र दिसणारे साहिल (आकाश ठोसर), मॅक (शुभम किरोडियन), गटल्या (सत्या मांजरेकर), चिली (मयूरेश पेम) आणि बिली (पवनदीप) या पाच मित्रांचा कुठलाच रॉकबॅण्ड नाही किंवा त्यांचा संगीताशी काही संबंधही नाही. पण चित्रपटात काही मिनिटांच्या अंतराने प्रसंग दर प्रसंग गाणी वाजत राहतात. या पाच मित्रांपैकी चौघांचे आई-वडील, त्यांच्या उपकथा, नायिकेचे वडील, दोन नायिका, महाविद्यालयाचे सतत इथे तिथे थुंकणारे प्राचार्य पांडे (आनंद इंगळे), मुलांनी बघता क्षणी प्रेमात पडावी, अशी शीना मॅडम (ईशा कोप्पीकर) आणि तिचा प्रियकर म्हणून क्रीडा प्रशिक्षक बापट (चेतन हंसराज..?) असा खूप मोठा व्यक्तिरेखांचाच पसारा चित्रपटात आहे. त्यामुळे कधी साहिल-रेवती (वैदेही परशुरामी) या मुख्य जोडीची प्रेमकथा सुरू होते, मग गटल्याची प्रेमकथा.. त्याला कुटुंबातील तणावाची जोड, मॅक आणि ताराची गोष्ट असे अनेक तुकडे तयार होतात, संपतात. पण ते कुठेही एकसंध जोडले जाऊन एक छान कथा अनुभवता येत नाही.

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”

आकाश ठोसरचा हा दुसरा चित्रपट असल्याने साहजिकच त्याच्याबद्दल उत्सुकता जास्त होती. पण साहिलच्या भूमिकेत आकाशने संवादात पूर्णपणे मार खाल्ला आहे, त्याचे तोंडातल्या तोंडात पुटपुटल्यासारखे संवाद आणि त्याचा हेल या दोन्ही गोष्टी त्याच्या चित्रपटातील एकूणच वावरण्यावर पाणी टाकतात. संस्कृती किंवा वैदेही यांना सुंदर चेहरा, गाणी आणि काही प्रसंग वगळता फार काम नाही. त्यातल्या त्यात मयूरेश पेमचे नृत्यकौशल्य आणि त्याच्या अभिनयातील सहजता यामुळे तो त्यांच्यात उजवा वाटतो. तर मॅकच्या भूमिकेत शुभम किरोडियन काही प्रसंगात भाव खाऊन गेला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित संगीतमय चित्रपट आणि तेही महाविद्यालयीन विश्वाभोवती फिरणारा. या दोन्ही गोष्टी त्यांनी चित्रपटात पहिल्यांदाच हाताळल्या आहेत. खरे तर, मांजरेकरांचा चित्रपट म्हणून या प्रयोगाबद्दलच्या अपेक्षा जास्त होत्या. यात काही व्यक्तिरेखा आणि प्रसंगांच्या मांडणीत दिग्दर्शक म्हणून त्यांचा ठसा जाणवतो. विशेषत: मॅकचे वडील म्हणून बोमन इराणींची व्यक्तिरेखा आजच्या वास्तवाच्या जवळपास जाणारी आहे. मॅक आणि त्याच्या वडिलांचे प्रसंग चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीने आले आहेत. गटल्याचे शिक्षिकेच्या प्रेमात पडणे आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी केलेली क्लृप्ती, वडिलांबद्दलचा त्याचा बदलत गेलेला दृष्टिकोन हे प्रसंग खास मांजरेकरांच्या शैलीच्या जवळ जाणारे आहेत. मात्र हे सगळेच कथा-उपकथांचे तुकडे ठोकळ्यांप्रमाणे असंबद्ध पद्धतीने मांडले गेले आहेत. बाल्कनीत उभी राहून कपडे बदलणारी बाई, तिच्याकडे बघणारे आजोबा यांच्यासारखे ‘क्लिशे’ प्रसंग किंवा महाविद्यालयात गेल्यावर मुलं-मुली फक्त नाचगाणी, प्लेबॉय वाचणं, शिवराळ संवाद, आई-वडिलांशी वाद याच पद्धतीचे असतात, असे गृहीत धरून केलेली भडक मांडणी चित्रपटाला वास्तवापासून दूर नेते. ही मांडणी हिंदीत अजय देवगण, अक्षय कुमार, गोविंदा यांच्या तरुणपणीच्या चित्रपटांमध्ये हिट ठरली होती पण तो काळ आता मागे पडला आहे. आजच्या पिढीचा स्मार्टनेसही यात दिसत नाही. त्यामुळे ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’ हा एका अर्थाने कोऱ्या पॅकेजमधला जुनाच मालमसाला इतपतच मर्यादित राहतो.

चित्रपट : एफ.यू.’ – फ्रेंडशिप अनलिमिटेड

  • दिग्दर्शक – महेश मांजरेकर
  • कलाकार – आकाश ठोसर, वैदेही परशुरामी, सत्या मांजरेकर, शुभम किरोडियन, संस्कृती बालगुडे, मयूरेश पेम, पनवदीप, महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, बोमन इराणी, आनंद इंगळे, ईशा कोप्पीकर, चेतन हंसराज, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, राधिका विद्यासागर.