मराठी मालिकांमध्ये परिश्रमाच्या मानाने मिळणारा पैसा अतिशय तोकडा आहे. त्या तुलनेत हिंदी मालिकांमध्ये परिश्रमाचे मोल भरभरून मिळते. त्यामुळे मला मराठी भाषा उत्तम बोलता येत असली तरीही मी मराठी मालिकांमध्ये काम का करावे? असा प्रश्न अभिनेता सुमित राघवन याने उपस्थित केला. दक्षिण भारतीय सुमितची मराठी भाषेवर भरभक्कम पकड आहे. सब टीव्हीवर ९ जूनपासून सुरू झालेल्या ‘बडी दूर से आये है’ या हास्य मालिकेच्या प्रमोशनकरिता नागपुरात आला असताना त्याने परखडपणे आपले विचार मांडले.
एलियन कुटुंबाच्या अवती-भोवती गुंफलेली ही एक नाविन्यपूर्ण मालिका आहे. एलियन कुटुंबाच्या समाज आणि संस्कृतीच्या अनुकूल बनण्याचा अनुकूल संघर्ष यात दाखविण्यात आला आहे. सुमित राघवन यात फादर एलियनची तर रुपाली भोसले यात मदर एलियनची भूमिका साकारत आहे.
मराठी रंगभूमी आणि मराठी बायको यामुळे मराठी भाषेवर प्रभुत्त्व मिळवल्याचे सुमितने सांगितले. ‘गोष्टी वेल्हाळ वेल्हाळ’ या मालिकेतील एका भागातच काम केले आणि त्या एका भागाचे अवघे ५०० रुपये हातावर टेकवण्यात आले. त्यामुळे मराठी मालिका कधीही करणार नसल्याचे तो म्हणाला. टीव्ही मालिकांमध्ये काम करताना दोनच्यावर रिटेक करण्याची संधी कलावंताला नसते, त्यामुळे टीव्हीवरील कलावंत हे अधिक कणखर असतात. हिंदीवरही तेवढेच प्रभुत्त्व मिळवण्यासाठी उर्दूचे वर्ग लावले आणि त्याचा फायदा झाल्याचे सुमित म्हणाला. ‘संदूक’ नावाचा त्याचा मराठी चित्रपट येत्या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या मालिकेत काम करताना खूप काही वेगळे शिकायला मिळत आहे. अनेक भावनात्मक प्रसंग यात आहेत, पण दैनंदिन मालिकांकडे जाणारी ही मालिका नाही. यापूर्वी नाटकांमध्ये काम केले आहे, पण आता ते शक्य नाही. नाटक आणि मालिका या दोन्हीचा समतोल साधणे अतिशय कठीण आहे, असे मत रुपाली भोसले हिने व्यक्त केले. महाराष्ट्रीयन असूनही मराठी मालिकांमध्ये काम करणे आता बंद केल्याचे ती म्हणाली. सध्याच्या घडीला ‘विनाकारण राजकारण’ हा तिचा मराठी चित्रपट तयार असून, दिवाळीकडे तो प्रदर्शित होणार आहे.