वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. हिंदीमध्ये या ‘बिग बॉस’ची अनेक पर्व पार पडली. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या दाक्षिणात्य अवतारालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता याच ‘बिग बॉस’चा मराठी अवतार येत्या १५ एप्रिपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरू होत आहे. या कार्यक्रमात कोणकोणते मराठी कलाकार सहभागी होणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अशातच बिग बॉसच्या घरात दाखल होणाऱ्या काही कलाकारांची नावं चर्चेत आहेत.

मराठी बिग बॉससाठी सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी. उषा नाडकर्णी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. ‘तप्तपदी’चित्रपटातील मुख्य कलाकार कश्यप परुळेकर याच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. यादीतील तिसरं नाव आहे अभिनेता राजेश श्रृंगारपुरे. राजेश नुकताच ‘डॅडी’ या बॉलिवूडपट चित्रपटात झळकला होता. त्याच्या अभिनयाचं प्रेक्षक- समीक्षकांकडून विशेष कौतुकही करण्यात आलं होतं.

वाचा : कारागृहात असताना सलमानने ‘त्या’ चिमुकल्याची इच्छा केली पूर्ण 

मराठी बिग बॉसच्या घरात दाखल होणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता सुशांत शेलारचाही समावेश आहे. मनोरंजन आणि राजकारण हे समीकरण सुशांत शेलारसाठी तंतोतंत आहे. बिग बॉसचं घर म्हणजे राजकारणाचा आखाडाच. कदाचित म्हणूनच बिग बॉसने सुशांतची निवड केली असावी. कॉमेडी एक्स्प्रेस मालिकेने लोकप्रिय ठरलेल्या अभिनेता भूषण कडूचंही नाव चर्चेत आहे. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमातील समीर चौघुले यांच्या नाटिका सर्वाधिक लोकप्रिय आहेत. बिग बॉसच्या घरातही कॉमेडीचा तडका असावा, यासाठीच भूषण आणि समीर यांची निवड केली असावी, असं म्हटलं जात आहे.

स्पर्धकांच्या यादीतील आणखी एक नाव म्हणजे अभिनेत्री रेशम टिपणीस. बोल्ड आणि बिनधास्त अशी ओळख असलेल्या रेशमचीही जोरदार चर्चा आहे. मराठी बिग बॉसच्या घरात दिसणारी आणखी एक अभिनेत्री म्हणजे मेघा धाडे. अभिनेत्री म्हणून मेघाला फारसं यश मिळालं नाही. मात्र, बिग बॉस तिच्यासाठी सर्वोत्तम संधी असू शकते.

वाचा : कारागृहात असताना सलमानने ‘त्या’ चिमुकल्याची इच्छा केली पूर्ण 

१५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या पर्वाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात काय होणार, याची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे. तेव्हा स्पर्धकांच्या नावांची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.