सौरभ वर्मा दिग्दर्शिक ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिका साकारत असून पहिल्यांदाच ती एका आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटामध्ये मास्क मॅन अशा नावाची व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे. आतापर्यंत या चित्रपटाचं पोस्टर, टीझर आणि काही गाणी प्रदर्शित झाली. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच सोनाली कुलकर्णीची एण्ट्री होते. या चित्रपटामध्ये ती एक कॉमिक बूक आर्टिस्ट आहे. कॉमिक बूक आर्टिस्ट असण्यासोबतच तिचं एक घड्याळाचं दुकान आहे. आपल्याच कामामध्ये मग्न असलेली सोनाली अचानकपणे धावू लागते. सुरुवातीला ती नक्की का धावते हे स्पष्ट होत नाही. मात्र नंतर ती मास्क मॅनपासून दूर जाण्यासाठी धावत असल्याचं लक्षात येतं. तसंच तिच्या पुढे असलेल्या वेळेच्या गणिताचं कोड उलगडण्यासाठी तिला हॅकर मित्र, विद्या आणि पबजी आजी मदत करताना दिसत आहे. हा ट्रेलर बघितल्यानंतर “ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?, मास्क मॅन नक्की कोण आहे? हा वेळेचा नक्की काय खेळ आहे, चित्रपटामध्ये वेळेचा, विक्की, विद्या आणि मास्क मॅनचा नक्की काय संबंध आहे, असे अनेक उत्कंठादायक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच ताणली गेली आहे.


‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे या चित्रपटाची प्रस्तुती प्रणय चोक्शी आणि डान्सिंग शिवा यांच्या सहकार्याने करत आहेत. ‘विक्की वेलिंगकर’चे दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले असून निर्मिती ‘जीसिम्स’, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.