अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सध्याच्या घडीला ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असणारी अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आणखी एका चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. राजकुमार रावसोबत कंगना पुन्हा एकदा ‘मेंटल है क्या’, या चित्रपटातून झळकणार आहे.

आपल्या आगामी चित्रपटाविषयी कंगना म्हणाली, गेल्या वर्षांमध्ये ज्या प्रकारचं आयुष्य आपण जगलो आहोत ते पाहता सर्वांसमोर तिची वेगळीच प्रतिमा उभी करण्यात आली. कधीकाळी तर कंगनाला वेडी आणि विक्षिप्तपणे वागणारी म्हणूनही संबोधण्यात आलं. इतकंच नव्हे तर वेळोवेळी तिचा पाणउताराही करण्यात आला. पण, आता मात्र आपल्याला वेडी म्हणून खिल्ली उडवणाऱ्यांना ‘मेंटल है क्या’ या चित्रपटातून चांगलंच उत्तर मिळणार आहे, असं तिने स्पष्ट केलं आहे. एखाद्याला मेंटल, वेडी यांसारख्या नावनं संबोधणं चुकीचं आहे, असंही कंगना म्हणाली.

याच आठवड्यात कंगनाच्या ‘मेंटल है क्या’ या आगमी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. यात कंगनासोबत राजकुमार रावही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील काही पोस्टरची मालिका सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. या चित्रपटातून राजकुमार आणि कंगना ही हिट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील पोस्टरमध्ये पात्रांचा विक्षिप्तपणा ठळकपणे दाखवण्यात आला आहे, त्यामुळे चित्रपटाचे हटके पोस्टर पाहून अनेक प्रेक्षक याबाबत उत्सुक आहेत.