नाना पाटेकरनंतर लेखक चेतन भगत, चित्रपट निर्माते विकास बहल, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर देखील काही महिलांनी गैरवर्तुणीचे आरोप केले आहेत. #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत त्यांचे खरे चेहरे समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ही प्रकरणं ताजी असतानाच आता आणखी एक अभिनेता चित्रपट निर्माता वादात सापडला आहे.

बॉलिवूडमधला परिचयाचा चेहरा असलेल्या रजत कपूर यांच्यावर दोन महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे. या आरोपानंतर रजत कपूर यांनी ट्विटरवर जाहीर माफी मागीतली आहे. ‘मी आयुष्यभर एक सभ्य पुरूषासारखं जगण्याचा प्रयत्न केला. जे योग्य तेच मी करत होतो. मात्र माझ्या कृतीतून आणि शब्दातून काहीजण दुखावले, माझ्यामुळे कोणालातरी खूप दु:ख झालं याचं मला खूप वाईट वाटत आहे. मी त्यासाठी सगळ्यांची माफी मागतो. कामापेक्षाही एक चांगली व्यक्ती होणं हे माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता या क्षणापासून मी एक चांगली व्यक्ती होण्यासाठी जास्त मेहनत करेन’ असं म्हणत रजत कपूरनं माफी मागितली आहे.

मुलाखतीदरम्यान रजत यांनी आपल्यासोबत लैंगिक गैरवर्तणुक केल्याचा आरोप एका महिला पत्रकारानं केला, त्यानंतर अल्पावधीत रजत कपूर यांनी माफी मागत हे प्रकरण पूर्णपणे शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.