लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे दिग्दर्शक साजिद खानला ‘हाऊसफुल ४’ चित्रपट सोडावा लागला. तर नाना पाटेकर यांनीदेखील याच आरोपांमुळे चित्रपट सोडला. दोघांवर असलेले आरोप आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे काही काळ सेटवर एक विचित्र वातावरण होतं मात्र याचा परिणाम चित्रपटावर होणार नाही याची पुरेपुरे काळजी चित्रपटातील कलाकारांनी घेतली असं अभिनेत्री क्रिती म्हणाली.

क्रिती सोबतच अक्षय कुमार, बॉबी देओल, राणा डगुबत्ती, पुजा हेगडे, रितेश देखमुख या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. तर साजिद खान या चित्रपटाचं दिग्दर्शन करत होता. मात्र लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे त्याला आणि नाना पाटेकर यांना चित्रपट अर्धवट सोडावा लागला. दोघांच्या जाण्यानं चित्रपटातील अनेक दृश्य पुन्हा चित्रित करावी लागली तर निर्मात्यांना याचा आर्थिक फटकाही बसला होता.

‘या आरोपांमुळे काही काळ सेटवर एक विचित्र वातावरण होतं. इतके दिवस साजिद खानच्या हाताखाली काम केलं अचानक दुसऱ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली संपूर्ण टीम काम करू लागली. सगळ्यांसाठी हे कठीण होतं मात्र या वादाचा चित्रीकरणावर परिणाम होऊ द्यायचा नाही हे सर्व कलाकारांनी पक्क केलं आणि चित्रीकरण वेळेत पार पडलं’ असं क्रिती म्हणाली.

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. त्यानंतर नाना पाटेकर यांच्या जागी राणा डगुबत्तीला घेण्यात आलं तर साजीद खानच्या गच्छंतीनंतर फरहाद सामजी यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली .