#MeToo मोहिमेंतर्गत मनोरंजन क्षेत्रातील लैंगिक शोषणाची अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत. त्याता आता आणखीन एक प्रकरण समोर आले असून यामध्ये एका महिलेनेच महिलेवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडिअन अदिती मित्तलवर दुसऱी महिला कॉमेडिअन कनीज सुरका हीने जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा आरोप केला आहे. ट्विटरवरुन तीने याची माहिती दिली.

कनीजने आपल्या ट्विटवरुन लिहीले की, माझ्यासोबत जे काही झाले ते सांगण्याची आता गरज आहे. दोन वर्षांपूर्वी अंधेरीमध्ये मी सुमारे १०० लोकांसह अन्य कॉमेडिअन्ससोबत एका कॉमेडी शोचे सुत्रसंचालन करीत होते. यावेळी आदिती मित्तल आपल्या जागेवरुन उठून स्टेजवर माझ्याजवळ आली आणि माझ्या परवानगीशिवाय माझे जबरदस्तीने चुंबन घेतले. हा प्रकार माझ्यासाठी लाजिरवाणा आणि धक्कादायक अनुभव होता. प्रत्येक व्यक्तीची आपली एक इच्छा आणि सीमा असते. माझ्या प्रकरणात आदितीने याचे उल्लंघन केले. एक वर्षांपूर्वी मी हिम्मत करीत यावर अदितीसोबत चर्चा केली. सुरुवातीला तर तीने यावरुन माझी माफी मागितली मात्र, त्यानंतर ती माझ्यावर दबाव टाकायला लागली. त्यामुळे मला खूपच दुःख झाले.

मात्र, #MeToo मोहिमेद्वारे आवाज उठवल्यानंतर लोक आपल्याला हिरो म्हणत आहेत यामुळे देखील आपण अस्वस्थ असल्याचे कनीजने म्हटले आहे. या मुद्दा जास्त वाढू नये यासाठी मी अदिती आणि माझ्यातील एका कॉमन मित्राद्वारे अदितीने सार्जजनिकरित्या माफी मागण्यास सांगितले. सुरुवातीला तर तिने असं घडल्याचं मान्य केलं होतं मात्र, आता तिने या घटनेचा इन्कार केला आहे. तसेच असं घडलंय का हे पुन्हा तपासून पाहण्याचा उलट सल्ला मला दिला.

या घटनेबाबतचे माझ्याकडे पुरावे आहेत. मात्र, अदितीने ही घटना नाकारल्याने मला दुःख झाले असून त्यामुळे मला हे पाऊल उचलावे लागले. मात्र, मी आता गप्प बसणार नाही. जर अदिती अजूनही सार्जजनिकरित्या माफी मागण्यास तयार असेल तर मी हा मुद्दा इथेच संपवून टाकेन, असेही कनीजने म्हटले आहे. शेवटी तीने असेही म्हटले की, ही पोस्ट वाचणाऱ्या पुरुषांनी याला आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे समजू नये. ही पोस्ट बदला घेण्याच्या हेतूने नव्हे तर हे प्रकरण संपवण्याच्या हेतूने लिहीली आहे.