लैंगिक शोषणप्रकरणी अभिनेते आलोकनाथ यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्याविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली असून या प्रकरणी पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.

मनोरंजन आणि पत्रकारिता क्षेत्रातील महिला सहकाऱ्यांशी लैंगिक गैरवर्तनाच्या अनेक घटनांना सध्या ‘मी टू मोहिमे’च्या निमित्ताने वाचा फुटत आहे. लेखिका विनता नंदा यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट लिहून अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. विनता नंदा यांनी बुधवारी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात आलोकनाथांविरोधात लेखी तक्रार दिली. यात त्यांनी आलोकनाथांवर बलात्काराचा आरोप केल्याचे समजते. चौकशी केल्यानंतर आलोकनाथांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

विनता नंदा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ओशिवरा पोलिसांनी माझी तक्रार स्वीकारली आहे. आता पुढील प्रक्रियेला सुरुवात होईल. मला मंगळवारी संध्याकाळी मानहानी प्रकरणी नोटीस मिळाली आहे. माझे वकील यासंदर्भात काम करत आहेत. ते सध्या दिंडोशी न्यायालयात आहेत, अशी माहिती विनता नंदा यांनी दिली.

दरम्यान,आलोकनाथांनी नंदा यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. मी हे आरोप नाकारत नाही आणि स्वीकारतही नाही. मी या विषयावर अधिक बोलणार नाही, कारण तितकाच तो ताणला जाईल, असे आलोकनाथांनी म्हटले होते. इतकंच नव्हेत आलोकनाथांनी या प्रकरणी विनता नंदा यांच्यावर मानहानीचा खटला देखील दाखल केला.

वाचा: विनता नंदा यांनी आलोकनाथांवर केलेला आरोप

विनता नंदा यांच्यानंतर अभिनेत्री नवनीत निशान, संध्या मृदूल यांनी देखील आलोकनाथ यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. तर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील आलोकनाथांवर टीका केली होती. मद्याच्या अधीन गेल्यानंतर आलोक नाथांचं वेगळं रुप समोर येतं, असे रेणुका शहाणेंनी म्हटले होते.

या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सिंटा’ म्हणजेच ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’नं आलोक नाथ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिसीला दिलेल्या उत्तरातही त्यांनी आरोप फेटाळून लावले होते.