चित्रपट दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या आगामी ‘मलंग’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यातमध्ये आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अमृता खानविलकरनंतर आणखी एक मराठमोळा चेहरा झळकणार आहे.

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘असे हे कन्यादान’ या लोकप्रिय मालिकांमध्ये आणि ‘मिस्टर अँन्ड मिसेस सदाचारी’, ‘गुरू’ या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता प्रसाद जवादे ‘मलंग’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तो पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यापूर्वी प्रसाद नितेश तिवारी यांच्या ‘छिछोरे’ या चित्रपटामध्येही झळकला आहे.

“ चित्रपटाचं कथानक वाचल्यानंतर मला कोंकणी भाषेमध्ये काही संवाद बोलावले लागणार असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे मी माझ्या गोव्यातील एका मित्राकडून कोंकणी भाषा शिकण्यास सुरुवात केली. तसंच चित्रपटाचं डबिंग होत असताना त्या मित्रालाही सेटवर येण्यास सांगितलं. विशेष म्हणजे या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी जे प्रयत्न करत होतो ते पाहून मोहित सरांना आनंद झाल्याचं प्रसाद म्हणाला.

वाचा : मादाम तुसाँमध्ये स्थान मिळवणारी ‘सिंघम’ फेम काजल ठरली पहिली दाक्षिणात्य अभिनेत्री

पुढे तो म्हणतो, “मोहित सुरी यांना मराठी कलाकारांविषयी विशेष आदर आहे. ते खूप हुशार दिग्दर्शक आहेत. सिनेमा बनवताना ते अतिशय बारकाईने काम करतात. दिशा पाटनी, अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर यांच्याच नाही तर छोट्यातल्या छोट्या अभिनेत्याच्या भूमिकेच्या लकबींचा सुध्दा ते बारकाईने विचार करतात. दिग्दर्शक जर एवढा समर्पित होउन काम करत असेल, तर अभिनेत्यांनाही सिनेमाकडे तेवढ्याच डेडिकेशनने काम करण्याची प्रेरणा मिळते.”