‘धूम ३’ चित्रपटाने २०० कोटींच्या वर कमाई केली असली तरी मी आजपर्यंत पैशाचा विचार करून काम केलेले नाही, असे आमिर खानचे म्हणणे आहे. चित्रपटसृष्टीतील अन्य कलाकारांच्या तुलनेत मी फार कमी कमाई केली आहे, कारण पैशासाठी मी माझ्या भावनांशी तडजोड करू शकत नाही. पैसा मला विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे आजवर मी पैशाचा विचार करून काम केलेले नाही आणि तीच माझी मोठी ताकद आहे, असे आमिरने प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
‘धूम ३’सारख्या मेगा बजेट चित्रपटाला आपण न्याय देऊ शकू का? प्रेक्षक आपल्याला नव्या भूमिकेत स्वीकारतील का? या दडपणाखाली असलेल्या आमिरला धूम ३ चित्रपटाने तीन दिवसांत १०० कोटींच्या वर विक्रमी कमाई के ल्यानंतर सुटकेचा श्वास टाकता आला. ‘धूम ३’च्या यशानंतर आमिर आणि दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अगदी निर्धास्त मनाने वावरणाऱ्या आमिरने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ‘मला पैशाची गरज नाही असे नाही. पैसा ही आज सगळ्यांचीच गरज आहे. पण, मला एखाद्या चित्रपटासाठी १०० कोटी दिले आणि मला चित्रपटच आवडला नाही तर तो मी अजिबात करणार नाही. जिथे माझ्या भावनांना, तत्त्वांना मुरड घालावी लागेल, असे चित्रपट मी करणारच नाही. त्यामुळे मी इतरांपेक्षा कमी चित्रपट करतो आणि पैसाही तुलनेने कमी कमावतो’, असे आमिरने यावेळी बोलताना स्पष्ट केले. चित्रपट निर्मितीच्या वेळीही तो किती कमावणार? याचे गणित मी मांडत नाही. तसे केले असते तर ‘दिल्ली बेली’सारखा चित्रपट मी निर्माता म्हणून केला नसता. ती अ‍ॅडल्ट कॉमेडी होती. त्यात वाईट शब्दांचा वापर होता, पण हाही आयुष्याचा एक रंग आहे आणि तो लोकांना कळायला हवा, असे वाटले म्हणून मी त्याची निर्मिती केली आणि दाखवताना ‘अ’ प्रमाणपत्र घेऊनच तो दाखवला गेला, असे आमिर म्हणाला.
‘सत्यमेव जयते’सारख्या शोमधून विविध सामाजिक मुद्यांना हात घालणाऱ्या आमिरने आपल्याला यासाठी राजकारणात जाण्याची गरज नाही आणि इच्छाही नसल्याचे त्याने स्पष्ट केले.