करोनामुळे गेल्या वर्षांपासून रखडलेले आणि यावर्षी प्रदर्शनाच्या तयारीत असलेले मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आता निर्माते सरसावले आहेत. फे ब्रुवारी-एप्रिल दरम्यान दहापेक्षा अधिक मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत.

करोना आणि टाळेबंदीतच २०२० सरले. त्यामुळे अनेक चित्रपट तयार असूनही प्रदर्शित होऊ शकले नाहीत. २०१९-२०२० मधील रखडलेले आणि या वर्षांतील अशा सगळ्या चित्रपटांचे प्रदर्शन आता होणार आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकसंख्या कमी असल्याने मराठीतील मोठय़ा चित्रपटांचे प्रदर्शन करण्याचा धोका पत्करण्यासाठी निर्माते तयार नव्हते. ‘डार्लिग’ हा  बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनासाठी तयार झाला होता, मात्र एकच मोठा मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी असल्याने बहुपडदा चित्रपटगृह मालकांनी  घेण्याची तयारी दाखवली नाही.  मराठीत सध्या एकाच दिवशी दोन किंवा तीन चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होतील. मराठी चित्रपटांसाठी हे वर्ष चांगल्या कमाईचे आहे, असे मत चित्रपट वितरक अंकित चंदरामाणी यांनी व्यक्त केले आहे.

‘सूर्यवंशी’ नंतरच..

‘सूर्यवंशी’ हा हिंदीतील मोठा चित्रपट २६ मार्च किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतरच मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होतील, असा विश्वास चित्रपटसृष्टीतील जाणकार व्यक्त करत आहेत. मोठय़ा चित्रपटांच्या प्रदर्शनाची वाट न पाहता मराठीतील अनेक छोटे चित्रपट फे ब्रुवारी ते एप्रिल महिन्यांत प्रदर्शित होणार आहेत.

चित्रपट कोणते? : पुढच्या आठवडय़ातही ‘इमेल फिमेल’ आणि ‘बेफाम’ हा सिद्धार्थ चांदेकर-सखी गोखले या जोडीचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मार्चमध्ये ‘हॅशटॅग प्रेम’ आणि ‘झॉलीवूड’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होण्याची शक्यता लक्षात घेत मार्चचा अखेरचा आठवडा सोडून एप्रिलमध्ये ‘फ्री हिट दणका’, ‘राजकुमार’, ‘झोंबिवली’ आणि ‘गोदावरी’ असे चार मराठी चित्रपट प्रदर्शित होतील.