लॉसएंजल्स : यंदाच्या ऑस्कर स्पर्धेत कॅनडाच्या वतीने पाठवण्यात आलेला ‘फनी बॉय’ हा प्रसिद्ध निर्मात्या दीपा मेहता यांचा चित्रपट अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्स या संस्थेने नाकारला आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रवर्गात या चित्रपटाची प्रवेशिका होती पण या चित्रपटात पन्नास टक्क्य़ांहून अधिक संवाद हे इंग्रजी भाषेत असल्याने तो स्पर्धेसाठी ग्राह्य़ धरता येत नाही, असे सांगण्यात आले.

‘फनी बॉय’ या चित्रपटातील कथा १९७०-८० या काळात श्रीलंकेत घडल्याचे दाखवले असून त्यात तरुण बंडखोर नायक अरजी हा वांशिक संघर्ष काळात श्रीलंकेत राहणारा एक समलिंगी तरुण आहे.  त्याच्या या वेगळेपणाला त्याच्या कुटुंबात विरोध असतो. श्रीलंकेत तामिळी व सिंहली यांच्यातील संघर्ष तीव्र असतानाच्या काळातील हे कथानक आहे. हा चित्रपट श्याम सेल्वादुराई यांच्या कादंबरीवर आधारित आहे.