बिबटय़ाच्या हल्ल्यात गावकरी जखमी, जुन्नर परिसरातील गावांमध्ये बिबटय़ाची दहशत, शहरात बिबटय़ा दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट, वन विभागाकडून बिबटय़ा अखेर जेरबंद या आणि अशा स्वरूपाच्या बातम्या अनेकदा वाचायला मिळतात. त्यामुळेच ‘आजोबा’ या २००९ साली बातम्यांचा विषय ठरलेल्या बिबटय़ाचा प्रवास आणि त्यातील थरार ‘आजोबा’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार याबाबत प्रचंड औत्सुक्य होते. पण असा माहितीपटाचा विषय चित्रपटाच्या माध्यमातून मांडताना जो गोंधळ नेमका टाळायला हवा तोच गोंधळ आपणास पडद्यावर पाहावा लागतो. त्यामुळे माहितीपट आणि चित्रपट यांच्या सीमारेषेवर सतत घुटमळत राहाणारा हा चित्रपट पाहताना त्यातील रंजकता, थरार आणि त्याच्या जोडीने असंख्य ज्ञानसंवर्धनात्मक संदेश या साऱ्यांच्या भेसळीतून चित्रपट म्हटल्यावर त्यात जी गोष्ट असते ती मूळ गोष्टच हरवून जाते आणि हा सारा प्रवास कंटाळवाणा ठरतो.  
बिबटय़ाला कोठेही सोडले तरी आपल्या मूळ निवासाच्या (अधिवास) ठिकाणी परत जातो, मानवी वस्ती टाळतो, विनाकारण मानवावर हल्ला करत नाही हा अभ्यासातून सिद्ध झालेला सिद्धांत हा या चित्रपटाचा गाभा आहे. २००९ साली कल्याण-नगर मार्गावरील टाकळी ढोकेश्वर येथे एका कोरडय़ा ठाक विहिरीत अडकून पडलेल्या बिबटय़ाची सुटका केल्यानंतर त्याच्या शरीरात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित चिप बसवून त्याच्या हालचालींचा वेध घेण्याचा एक अनोखा उपक्रम विद्या अत्रेय यांनी हाती घेतला होता. त्यानंतर त्याचा २५ दिवसांत होणारा १२० कि.मी. प्रवास, तो नोंदविण्यासाठी वन्यजीव शास्त्रज्ञांनी केलला जिवाचा आटापिटा हे मूळ कथासूत्र. बिबटय़ाच्या शरीरात चिप बसवणे हा भारतातील पहिलाच उपक्रम आणि वन्यजीवांवर आधारित अशा उपक्रमावर बेतलेला पहिलाच चित्रपट असे दुहेरी वलय या कथेला लाभले आहे. त्या घटनेवर आधारित चित्रपट म्हटल्यावर सामान्य प्रेक्षकांच्या तसेच वन्यजीवप्रेमींच्यादेखील अपेक्षा उंचावल्या असणे हे स्वाभाविकच म्हणावे लागेल. परंतु, दिग्दर्शक-लेखक यांना माहितीपट दाखवायचा आहे की चित्रपट असा गोंधळ निर्माण झाला असावा अशी शंका वारंवार येत राहते.
वन्यजीव अभ्यासक पूर्वा राव या भूमिकेद्वारे ऊर्मिला मातोंडकर या चित्रपटाद्वारे प्रथमच मराठीच्या रूपेरी पडद्यावर झळकली. प्राण्यांचे निरीक्षण करणे, वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी लोकांना प्रशिक्षण देणे, जागरूकता निर्माण करणे हे तिचे आवडीचे काम. जुन्नर विभागात काम करताना टाकळी ढोकेश्वर येथील विहिरीत अडकून पडलेल्या बिबटय़ाला वनविभागाच्या मदतीने तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबटय़ाला सुरक्षित बाहेर काढण्यात तिला यश मिळते. त्यानंतर या बिबटय़ावर उपचार केले जातात आणि तो बरा झाल्यानंतर पुन्हा त्याला त्याचा अधिवास मिळावा यासाठी त्याला जंगलात सोडण्यात येते. त्यानंतर पूर्वा राव जंगल परिसरातील एका खेडेगावात आपलं बस्तान हलवते. चिपशी जोडलेली संगणकप्रणाली तिचा श्वास बनून जाते. आजोबाच्या हालचालीनुसार कॅमेरे लावते, त्याच्या नोंदी घेते. ज्याक्षणी आजोबा त्याच्या मूळ आधिवासात परततो त्याक्षणी केवळ पूर्वालाच नाही तर साऱ्याच सहकाऱ्यांना आनंद होतो हे त्याचेच प्रतीक म्हणावे लागेल. अप्रतिम छायाचित्रणांचे काही मोजकेच उल्लेखनीय तुकडे पाहायला मिळतात. मात्र संकलनातील घोळामुळे ते विसंगत वाटतात.
पूर्वा रावच्या मदतीसाठी वनविभागाचे अधिकारी शिंदे आणि जंगलांची माहिती, प्राण्यांची माहिती असलेला ज्ञानोबा सावंत या व्यक्तिरेखा चित्रपटात महत्त्वाच्या ठरतात. हृषीकेश जोशी यांनी अप्रतिम साकारलेला ज्ञानोबा सावंत प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. परंतु, शिवा ही मदतनीसाची व्यक्तिरेखा, शिवाचे त्याच्या गावातील तरुणीवर असलेले प्रेम, त्यांचा रोमान्स दाखविणे या सगळ्या गोष्टी उगाचच घुसडल्यासारख्या वाटतात. त्यातच अॅनिमेशनच्या साहाय्याने पडद्यावर जे काही दाखविले आहे ते दाखवले नसते तरी काहीच फरक पडला नसता. ऊर्मिलाने आपली व्यक्तिरेखा चांगली साकारली असली तरी या व्यक्तिरेखेला वन्यजीव अभ्यासक म्हणून काम करण्याची गोडी कशी लागली, हे तिचे करिअर आहे का, पूर्वा राव मधूनमधून दिलीप प्रभावळकरांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेला का भेटते वगैरे प्रश्न अनुत्तरित राहतात. महत्त्वाचे म्हणजे दिग्दर्शकाला एकाच वेळेस खूप साऱ्या घटकांना हात घालायचा आहे असेच जाणवत राहते. त्यामुळे एकाच वेळेस मनोरंजन आणि ज्ञानसंवर्धनात्मक लोकशिक्षण देणारे संदेश देण्याचा प्रयत्न असफल ठरतो. प्रेक्षकाला अनेक गोष्टी माहीत आहेत असे गृहीत धरून चित्रपटाची मांडणी झाली आहे. एकूणात आजोबाचा हा प्रवास विस्कळीत ठरतो.

आजोबा
निर्माते – लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे.
दिग्दर्शन-संकलन – सुजय डहाके.
छायालेखन – डिएगो रोमेरो.
पटकथा – गौरी बापट.
कथा-संवाद – सुजय डहाके.
संगीत – साकेत कानेटकर.
व्हिज्युअल इफेक्ट्स – इथिरियल
कलावंत – ऊर्मिला मातोंडकर, हृषीकेश जोशी, यशपाल शर्मा, ओम भूतकर, दिलीप प्रभावळकर, श्रीकांत यादव, शशांक शेंडे, नेहा महाजन.