छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकर, शशांक केतकर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे मुख्य भूमिकेत असणारी एक वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचे नाव “सोपं नसतं काही” असे असून ही सीरिज प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

“सोपं नसतं काही” या वेब सीरिजचे विप्लवा एंटरटेनमेंटस् एलएलपीचे संतोष रत्नाकर गुजराथी हे निर्माते आहेत. वेब सीरिजचे लेखन, दिग्दर्शन, संगीतकार अशी तिहेरी भूमिका मयुरेश जोशी सांभाळणार आहेत. अभिनेता अभिजीत खांडकेकर, शशांक केतकर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या महत्वपूर्ण भूमिका असून अभिनेते आनंद इंगळे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहेत.

विप्लवा एंटरटेनमेंटस् एलएलपीने याआधी रंगभूमीवर ॲब्सोल्युट, घरात मॅरीड बाहेर बॅचलर, नॅाक नॅाक सेलीब्रीटी अशी वैविध्यपूर्ण नाटके तर छोट्या पडद्यावर रुद्रम, कट्टीबट्टी अशा मालिकांची निर्मिती केली आहे. किस्से बहाद्दर या वेब सीरिजची निर्मिती देखील त्यांनी केली होती. आगामी सोपं नसतं काही या वेब सीरिज मधून नक्की काय “सोपं नसतं काही” हे जाणून घेण्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.