दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामध्ये काम केलेल्या संदीप नाहरने मंगळवारी आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी संदीपने सोशल मीडियावर सुसाईड नोट आणि व्हिडीओ आपण का आत्महत्या करत आहोत यासंदर्भातील खुलासा केला होता. मात्र आता संदीपच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर त्याने पोस्ट केलेली ही सुसाईड नोट आणि व्हिडीओ दोन्ही गोष्टी त्याच्या अकाऊंटवरुन डिलीट करण्यात आल्या आहेत. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी ही पोस्ट आणि व्हिडीओ डिलीट करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच ही पोस्ट आणि व्हिडीओ पोलिसांनी हटवलेले नाही असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ आणि पोस्ट नक्की कोणी डिलीट केली असा प्रश्न विचारला जात आहे.

संदीपने आत्महत्येपूर्वी पोस्ट केलेल्या या दोन्ही गोष्टी अचानक हटवण्यात येण्यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक तर्क लावले जात आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार संदीपची पत्नी कांचन शर्मा हिच्या सांगण्यावरुन ही पोस्ट हटवण्यात आली असेल. तर काहींनी व्यक्त केलेल्या शंकेनुसार सोशल मीडियावरील नियमांचं उल्लंघन करणारी संवेदनशील माहिती असल्याने वापरकर्त्यांच्या विनंतीवरुन सोशल मीडिया कंपनीने म्हणजेच फेसबुकने ही पोस्ट हटवली असेल. दैनिक भास्करशी बोलताना मुंबई पोलीस खात्यातील डीसीपी विशाल ठाकूर यांनी, “हा व्हिडीओ हटवण्यासंदर्भात पोलिसांकडे कोणताही अर्ज आला नव्हता. किंवा आम्हीही तो डिलीट केलेला नाही. कदाचित फेसबुकने त्यांच्या नियमांनुसार हा व्हिडीओ हटवला असेल. एखाद्या व्यक्तीसंदर्भातील आक्षेपार्ह मजूर असल्यास त्याबद्दल फेसबुककडे रिपोर्ट केल्यानंतर तो मजकूर हटवण्यात येतो. या प्रकरणामध्ये आम्ही तपास करत आहोत. फेसबुकवरुन संदीप यांची पोस्ट कोणी डिलीट केली? ती कशी आणि कधी डिलीट केली?, हा सुद्धा चौकशीचा विषय आहे,” अशी माहिती दिली. मुंबईत गोरेगावमधील राहत्या घरात संदीपचा मृतदेह आढळला.

धक्कादायक बाब म्हणजे संदीपने पोस्ट केलेल्या आत्महत्येसंदर्भातील पोस्ट आणि व्हिडीओबरोबरच मागील १४ महिन्यात त्याने अपलोड केलेला डेटाही हटवण्यात आला आहे. आता संदीपच्या पेजवर शेवटची पोस्ट १७ डिसेंबर २०१९ ची दिसत आहे.

काय लिहिलं होतं या सुसाईड नोटमध्यें?

“आता जगण्याची इच्छा होत नाहीये. जीवनात अनेक सुख दु:ख बघितले, पण सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आहे. आत्महत्या करणं भीत्रेपणाचं लक्षण आहे हे मला माहितीये, मलाही जगायचं होतं. पण जिथे आत्मसन्मान आणि समाधान नसेल तिथे जगून तरी काय फायदा…माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई विनू शर्मा यांनी मला कधी समजून घेतलं नाही किंवा कधी साधा तसा प्रयत्नही केला नाही. माझी बायको शिघ्रकोपी आहे. आमच्या दोघांच्याही व्यक्तीमत्वात खूप फरक आहे…रोज सकाळ-संध्याकाळ होणारी भांडणं सहन करण्याची ताकद आता माझ्यात नाही… यात माझ्या बायकोची चूक नाही…कारण तिला सगळं नॉर्मल वाटतं… पण माझ्यासाठी हे सामान्य नाही…मुंबईत अनेक वर्षांपासून आहे…खूप वाईट वेळही बघितली पण कधी ढासळलो नव्हतो. आत्महत्या मी खूप आधीच केली असती, पण मी स्वतःला वेळ दिला…सर्व ठिक होईल असं वाटलं…पण रोजच भांडणं होतात…या चक्रव्युहात अडकलोय..बाहेर पडण्याचा याशिवाय दुसरा रस्ता नाही…आता मला हे पाऊल आनंदाने उचलावं लागेल…इथल्या जीवनात नरक बघितला…इथून निघून गेल्यानंतर काय होईल माहिती नाही पण जे काही होईल मी त्याचा सामना करेल”. शेवटी संदीपने एक विनंती करताना, “एक रिक्वेस्ट है…मेरे जाने के बाद कांचन को कुछ मत बोलना पर उसके दिमाग का इलाज जरुर करवा लेना”, असं संदीपने सुसाइड नोटमध्ये नमूद केलं होतं.

एम. एस. धोनी चित्रपटासोबतच संदीपने अक्षय कुमारसोबत ‘केसरी’ (Kesri) आणि अनेक टीव्ही मालिकांमध्येही विविध भूमिका साकारल्या होत्या.