मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दिवशीच पार पडलेल्या ‘ठाकरे’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे तडकाफडकी उठून निघून गेले. या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. अपमान झाल्याने पानसे स्क्रीनिंगमधून तडकाफडकी बाहेर पाडल्याचे बोलले जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये निर्माते आणि खासदार संजय राऊत पानसेंना समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मुंबईतील अॅट्रिया सिनेमागृहातील हा सर्व प्रकार व्हायरल झाल्यानंतर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणावर आपले मत नोंदवले आहे.

२३ जानेवारी रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास हा सर्व घटनाक्रम घडल्यानंतर संदीप देशपांडे यांनी अभिजित पानसेंशी फोनवर याबद्दल चर्चा केली. याबद्दलची माहिती देशपांडे यांनी ट्विटवरून दिली आहे. रात्री पावणे अकराच्या सुमारास केलेल्या आपल्या ट्विटमध्ये देशपांडे म्हणतात, ‘अभिजितशी फोनवर बोललो. तो म्हणाला मी चित्रपट माननीय बाळासाहेबांच्या प्रेमापोटी केला. बाकी कोणी कसं वागायचं हा ज्याच्या त्याच्या संस्काराचा प्रश्न.’ या पुढे त्यांनी #I supportabhijitpanse हा हॅशटॅग वापरून घडलेल्या प्रकारानंतर अभिजितला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे.

त्यानंतर आज सकाळी म्हणजेच २४ जानेवारी रोजी सात वाजून ४० मिनिटांनी देशपांडे यांनी याच प्रकरणावरून आणखीन एक ट्विट करुन अभिजित पानसेंना पाठिंबा दर्शवला आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘कोणी अपमान करण्याचा प्रयत्न जरी केला तरी लाथ कशी मारायची हे काही लोकांना तुझ्याकडून शिकण्याची गरज आहे.’

तर तिसऱ्या ट्विटमध्ये देशपांडे यांनी नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी निर्मात्यांनाच सिनेमाचा संदेश समजला नसल्याची टिका केली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘मा.बाळासाहेब हे सामान्य शिवसैनिका ला सुद्धा प्रेमाने वागवायचे त्याचा अपमान नाही करायचे हाच ठाकरे चित्रपटाचा संदेश आहे जो या चित्रपटाची निर्मिती करण्याऱ्या ना सुद्धा कळला नाही.’

मागील दोन दिवसांपासून या चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शुभेच्छा देणारे पोस्टर्स मनसेतर्फे दादर- शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आले आहेत. पण या शुभेच्छा देताना शिवसेनेचा तसेच संजय राऊत यांचा उल्लेख जाणिवपूर्वक टाळण्यात आला आहे. ‘मनसे नेते अभिजित पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या ठाकरे चित्रपटला मनसे शुभेच्छा’ असं लिहित महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान काल ‘ठाकरे’ सिनेमाच्या स्क्रिनिंगमधून अभिजित पानसे नक्की कोणत्या कारणाने तडकाफडकी निघून गेले याबद्दल कोणीही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.