चित्रपट सृष्टीतील सुवर्णयुगाच्या स्मृती जागविणारा अजरामर चित्रपट म्हणजे  मुगल ए आझम. या चित्रपटाचं नाव कलाविश्वात सुवर्णाक्षराने कोरलं गेलं आहे. तब्बल १४ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर के. आसिफ यांनी हा चित्रपट तयार केला. विशेष म्हणजे हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला किंबहूना आजही प्रेक्षकांच्या मनावर हा चित्रपट राज्य करत असल्याचं पाहायला मिळतं. बॉलिवूडचा लोकप्रिय ठरलेला हा चित्रपट केवळ हिंदी भाषेतच प्रदर्शित झाला नसून अन्य भाषांमध्येही त्याचं डबिंग करण्यात आल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे हा चित्रपट चक्क तीन भाषांमध्ये झाल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर हा चित्रपट त्या काळातील बिग बजेट चित्रपट असल्याचंही म्हटलं जातं.

‘मुगल ए आझम’ या चित्रपटाचं त्याकाळी हिंदी व्यतिरिक्त अन्य दोन भाषांमध्ये डबिंग करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी दिग्दर्शकांना हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि इंग्रजी भाषेमध्येही या चित्रपटाची निर्मिती व्हावी असं वाटतं होतं. त्यानुसार त्यांनी प्रयत्नही केले. मात्र त्याचे हे प्रयत्न अपयशी ठरल्याचं सांगण्यात येतं.

‘मुगल ए आझम’ या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळविल्यामुळे त्याचं तामिळ आणि इंग्रजीमध्ये चित्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तामिळ रिमेकंच चित्रीकरणंही झालं.मात्र  तामिळ भाषेतील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान आपटला.ज्याप्रमाणे हिंदी भाषेतील चित्रपटाला लोकप्रियता मिळाली होती. ती लोकप्रियता मिळविण्यास तामिळ रिमेक अपयशी ठरला. परिणामी, हा चित्रपट सपशेल आपटला. तर इंग्रजीमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण करणं शक्य झालं नाही. काही कायदेशीर अडचणी आल्यामुळे या चित्रपटाचा इंग्रजी रिमेक करता आला नाही.

पाहा : बिग बींच्या लेकीचा शाही विवाहसोहळा; पाहा कधीही न पाहिलेले फोटो

दरम्यान, लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या या चित्रपटाचं त्याकाळी १.५ कोटी बजेट असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे त्याकाळी हा बिग बजेट चित्रपट असल्याचं दिसून येतं. हा चित्रपट १९६० साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात पृथ्वीराज कपूर,दिलीप कुमार, मधुबाला आणि दुर्गा खोटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.