|| मानसी जोशी

चित्रपटाचे मूल्य वाढवण्यासाठी तसेच तो अधिकाधिक प्रेक्षकांनी पाहावा यासाठी एकाच चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकारांना घेण्याची हिंदी चित्रपटसृष्टीतील संकल्पना आता वेबमालिकांमध्येही वापरली जाते आहे. चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांची फौज वेबमालिके त असेल तर त्याला प्रेक्षकवर्गही अधिक मिळेल हे यामागचे आर्थिक गणित. गेल्या पाच वर्षांत प्रेक्षकांना उत्कृष्ट आशय देण्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेबमालिकांचे निर्माते-दिग्दर्शकही शाहरुख खान, सैफ अली खान, सुश्मिता सेन, डिंपल कपाडिया अशा कलाकारांना प्राधान्य देत आहेत.

 

एकाच चित्रपटात अनेक कलाकारांची फौज असण्याची संकल्पना हिंदी चित्रपटसृष्टीला काही नवीन नाही. यामुळे चित्रपट यशस्वीही होतो तसेच त्याला जास्त प्रेक्षकवर्गही लाभतो. ‘गोलमाल’, ‘वॉर’, ‘रेस’, ‘कल हो ना हो’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘हम साथ साथ है’, ‘हम आपके है कोन’ ही यशस्वी बहुकलाकार असलेल्या हिंदी चित्रपटांची यादी न संपणारी आहे. एका चित्रपटात अनेक कलाकार ही संकल्पना आता नव माध्यमावरही वापरली जाताना दिसते आहे. गेल्या पाच वर्षांत ‘ओव्हर द टॉप’ म्हणजेच ओटीटी माध्यमांवर चांगला आशय देण्याची चढाओढ निर्माण झाल्याने आता वेबमालिके तही लोकप्रिय चेहऱ्यांची वर्णी लागताना दिसते आहे. प्रेक्षकांची मनोरंजनाची भूक भागवण्यासाठी करण्यात येत असलेले हे प्रयोग मनोरंजन क्षेत्रातील नव्या बदलाची नांदी असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

हिंदीत याची सुरुवात ‘सेक्रेड गेम्स’ या यशस्वी वेबमालिके ने झाली. अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी, राधिका आपटे यांच्या अभिनयाने नटलेल्या या वेबमालिके ने डिजिटल विश्वात इतिहास घडवला. या वेबमालिके चा पहिला भाग यशस्वी ठरल्यावर दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. पहिल्या भागाचा उत्कंठावर्धक शेवट आणि कलाकारांचा अभिनय या जोरावर दुसरा भाग प्रेक्षकांनी पाहिला. त्यानिमित्ताने प्रथमच वेबमालिके त अनेक लोकप्रिय कलाकारांना एकत्रित काम करताना पाहण्याचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील राजकारणावर बेतलेल्या ‘मिर्झापूर’ मध्येही पंकज त्रिपाठी, अली फजल, रसिका दुग्गल, श्रिया पिळगावकर असे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले.

पौराणिक कथा असलेल्या ‘झी ५’ वरील ‘पौरुषपूर’ या वेबमालिके तही आता शिल्पा शिंदे, अनू कपूर, मिलिंद सोमण आणि शाहीर शेख हे दमदार कलाकार प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहेत. तर काही दिवसांपूर्वी गाजलेल्या शास्त्रीय संगीतावर आधारित ‘बंदीश बँडीट्स’मध्ये नासिरूद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, रित्वीक भौमिक आणि श्रेया चौधरी या कलाकारांच्या जोडीने कमाल केली. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेला ‘ड्राइव्ह’ हा वेबपटही बहुकलाकार असलेलाच होता. जॅकलीन फर्नांडिस, सुशांत सिंह राजपूत, सपना पाब्बी, पंकज त्रिपाठीसारख्या कलाकारांची या वेबपटात महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर वेबपटांचा ट्रेण्डही ओटीटीवर चांगलाच रुळला. मीरा नायर यांची ‘सुटेबल बॉय’हीसुद्धा बहुकलाकार असलेली वेबमालिका आहे. तब्बू, राम कपूर, इशान खत्तार, रणदीप हुडा, विवान शाह, शहाना गोस्वामी, रणवीर शौरी, विनय पाठक, विजय वर्मा, कु लभूषण खरबंदा असे सगळेच नवे-जुने प्रसिद्ध कलाकार या वेबमालिके त आहेत. या आठवड्यात प्रदर्शित झालेली राजकारणाचा खेळ रंगवणारी ‘तांडव’ ही वेबमालिकाही याचे चांगले उदाहरण ठरली आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अली अब्बास जफरने दिग्दर्शित के लेली ही वेबमालिका अभिनेता सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसमध्ये चित्रित झाली आहे. त्याचेही कु तूहल प्रेक्षकांना आहे. या वेबमालिके त सैफ अली खान, डिंपल कपाडिया, झीशान अयुब, दिनो मोरिया आणि गौहर खान अशी तगडी कलाकारांची फौज आहे.

‘वुट’वर प्रदर्शित झालेल्या ‘द रायकर केस’ या वेबमालिके तही अतुल कुलकर्णी, अश्विानी भावे, सचिन खेडेकर, ललित प्रभाकर हे लोकप्रिय चेहरे होते. याचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी वेबमालिके च्या या बहुकलाकारी ट्रेण्डबद्दल अभ्यासपूर्ण निरीक्षण नोंदवले. ‘अजूनही आपल्याकडे लोकप्रिय चेहरे असल्यास तो चित्रपट आणि वेबमालिका यशस्वी होतात, अशी मनोरंजनविश्वााची मानसिकता आहे. ओटीटीवरील आर्थिक गणित हे प्रेक्षकसंख्येवर अवलंबून असते. लोकप्रिय कलाकार असल्यास ओटीटी तसेच निर्मात्यांकडूनही वेबमालिके साठी मोठ्या बजेटला परवानगी दिली जाते. कोणती वेबमालिका जास्त पाहिली जाईल, अथवा प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण होईल याचा विचार करता त्यातील कलाकारांची निवड हा घटक मोलाची भूमिका बजावतो. आणि लोकप्रिय चेहरे असल्यास वेबमालिका यशस्वीही होते आणि त्याची चर्चा होते. त्यामुळे वेबमालिके साठी कलाकारांची निवड करताना चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. हे पटवताना सरपोतदार यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’चे उदाहरण दिले. यातील बड्या कलाकारांमुळे ही वेबमालिका जास्त पाहिली जाते आहे. या ऐवजी पे्रक्षकांना माहिती नसलेल्या कलाकारांना संधी दिली असती तर, याला किती प्रेक्षकवर्ग लाभला असता हा कळीचा मुद्दा आहे. तसेच समाजमाध्यमांवरही कलाकारांचा वेगळा चाहतावर्ग असल्याने वेबमालिके लाही त्याचा फायदा होतो. आता या पाच वर्षांत ओटीटी माध्यमाचे महत्त्वही वाढल्याने मोठे कलाकारही वेबमालिके त झळकू लागले आहेत. कधी तरी कथा तेवढी दमदार नसल्यास मोठ्या कलारांच्या निवडीने तो समतोल साधला जातो. त्यामुळे भविष्यात प्रेक्षकांना अनेक बहुकलाकार वेबमालिका पाहण्यास मिळतील, असेही आदित्य सरपोतदार यांनी स्पष्ट केले.

फक्त कलाकारांच्या प्रसिद्धीकडे न पाहता भूमिकेस योग्य आणि चांगला अभिनय करणाऱ्या कलाकारांची निवड करावी, असा सल्ला ‘नक्षलबारी’ आणि ‘समांतर २’ या वेबमालिके चे निर्माते कार्तिक निशानदार देतात. काही वेळेला मोठ्या कलाकाराची निवड करताना तो संबंधित भूमिकेला कितपत न्याय देऊ शकेल याचा विसर निर्माते दिग्दर्शकांना पडतो. ‘समांतर २’ तसेच आता ‘नक्षलबारी’ या वेबमालिके च्या वेळेस आम्ही टीव्ही आणि रंगभूमीवरील चांगला अभिनय करणाऱ्या कलाकारांना प्राधान्य दिले. ‘नक्षलबारी’मध्ये राजीव खंडेलवालनंतर चार वर्षांनी पदार्पण करणारा आमिर अली जास्त भाव खाऊन गेला. आमच्या आगामी वेबमालिके त चित्रपटसृष्टीतील आघाडीची नावे जोडली गेली आहेत, असे निशानदार यांनी स्पष्ट केले.

बहुकलाकारी मालिका

  •   क्रिमिनल जस्टीस
  •   मेड इन हेवन
  •   फोर मोर शॉट्स
  •   द रायकर केस
  • ताजमहल १९८९
  •   पाताल लोक
  •   अ सुटेबल बॉय
  •   फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलीवूड वाईवज,
  •  एक थी बेगम