News Flash

फ्लॅशबॅक : लोकप्रिय चेहरे पहिल्यांदा एकत्र आणणारा ‘वक्त’

एकाच चित्रपटात सात-आठ नामवंत चेहरे एकत्र येणे वा आणणे आता तसे नवीन वा आव्हानात्मक राहिलेले नाही.

flashback, ajay devgnएकाच चित्रपटात सात-आठ नामवंत चेहरे एकत्र येणे वा आणणे आता तसे नवीन वा आव्हानात्मक राहिलेले नाही. पण पहिल्यांदाच असा प्रकार वा प्रयत्न झाला तेव्हा…

बी. आर. चोप्रा निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित बी. आर. फिल्म्सचा ‘वक्त’ (१९६५) हा आपल्याकडील पहिला मल्टी स्टार कास्ट चित्रपट मानला जातो. बलराज साहनी, राजकुमार, सुनील दत्त, साधना, शशी कपूर, शर्मिला टागोर, अचला सचदेव, मदन पुरी व रेहमान असे त्या काळातील नामवंत कलाकार एकाच चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळवायचे तर अनेक गोष्टी जमवून आणायला हव्यात. सर्वप्रथम मध्यवर्ती कथासूत्र व प्रत्येकाला बर्‍यापैकी वाव मिळेल अशी पटकथा हवी. अशा चित्रपटाचा निर्मिती खर्चही वाढतो. पण बी. आर. फिल्म ही त्या काळातील नामवंत संस्था होती. चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षक असा दोन्हीकडे त्याचा दबदबा होता. ‘वक्त’चे कथासूत्र आज फारसे रंगतदार वाटणार नाही. पण त्या काळात ते उत्सुकतेत भर घालणारे होते. तीन लहान मुले असणार्‍या एका दाम्पत्याच्या (बलराज साहनी व अचला सचदेव) यांच्या लग्नाचा वाढदिवस सोहळा गीत संगीताने रंगात आला असतानाच प्रचंड मोठ्या भूकंपाने हाहाकार उडतो. त्यात कोण कुठे जातो तेच कळत नाही. सगळेच कुटुंब विस्कळीत होते. फक्त सर्वात छोटा तेवढा आईसोबत राहतो. कालांतराने ही सगळी भावंड मोठी होतात. काहीना काही कारणास्तव ते एकमेकांच्या संपर्क व सहवासात असूनही एकमेकांना ओळखत नाहीत. यातच दिग्दर्शकाचे कसब होते व त्यात यशजी सरस ठरले. चित्रपट माध्यमाच्या जाणकारांच्या मते दिग्दर्शक म्हणून यश चोप्रांचा हा सर्वोत्तम चित्रपट आहे. कारण चित्रपटभर धक्कादायक वळणे व उत्कंठता वाढविणारे प्रसंग आहेत. अठरा रिळांचा हा मनोरंजनाचा खच्चून मसाला होता. दोन नायक व एक प्रेयसी ( राजकुमार, सुनील दत्त व साधना) हेदेखील त्यात रंगले. ‘जानी’ राजकुमारच्या डायलॉगबाजीलाही वाव मिळाला, “जिनके अपने घर शिशे के हों… वो दुसरों पर पत्थर नही फेंका करते|” अथवा “ये बच्चों के खेलने की चीज नही… हात कट जाए तो खून निकल आता हैं|’ साहिर यांची गीते व रवि यांचे संगीत यातही विविधता होती. “ए मेरी झोरा झबी, तुझे मालून नही” ही मन्ना डेची कव्वाली जबरा हिट. इतरही गाण्याच्या जागा चित्रपटाची रंगत वाढविण्यात उपयोगी ठरल्या.

‘वक्त’ च्या घवघवीत यशाने मल्टी स्टार कास्ट चित्रपट निर्मितीला विश्वास मिळाला. ती रुळायला व रुजायला मात्र काही काळ जावा लागला. कारण एक तर तशी पटकथा हवी व हिंदी चित्रपटाच्याच भाषेत सांगायचे तर, “हर चीज का एक ‘वक्त’ होता है, आप चाहो या न चाहो…”
दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 1:05 am

Web Title: multi starrer movie waqt
Next Stories
1 शर्मिला टागोर यांना ‘त्यांनी’ भेट दिले चक्क सात फ्रिज
2 टॉम क्रूझने नऊ मिनिटांत दाखवले त्याचे फिल्मी करिअर
3 करण देशाच्या विरुद्ध काहीही करणार नाही- फराह खान
Just Now!
X