गेल्या काही काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असणारा अभिनेता उदय चोप्रा पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. काही दिवसापूर्वी उदयने भारतात गांजाला कायदेशीर परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्याच्या या मागणीमुळे मुंबई पोलिसांनी त्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला होता. मात्र आता मुंबई पोलीस याप्रकरणी थोडे शिथील झाले असून त्यांनी उदयची खिल्ली उडविली आहे.

मारिजुआना म्हणजेच गांजाला कायदेशीर परवानगी द्या अशी मागणी उदयने एका ट्विटच्या माध्यमातून केली आहे. ‘माझ्या मते भारतात गांजाला कायदेशीर परवानगी देण्यात आली पाहिजे. सर्वप्रथम तर हा आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर त्यासाठी कायदेशीर परवानगी देण्यात आली तर त्यावर आकारल्या जाणाऱ्या करातून बराच नफाही मिळू शकतो’, असं ट्विट त्याने केलं. त्यासोबतच गांज्याचे वैद्यकीय फायदे असल्याचंही त्याने या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. त्याने केलेल्या गांच्याच्या वैद्यकीय फायद्याच्या मुद्द्यावरुन मुंबई पोलिसांनी त्याची खिल्ली उडविली असून कोकेनचेही काही वैद्यकीय फायदे आहेत का ? असं म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी एका ट्विटच्या माध्यमातून विनोद निर्मिती केली आहे. जर गांज्याला वैद्यकीय फायदे आहेत. त्याप्रमाणे कोकेनचेही वैद्यकीय फायदे असतील. मग कोकेनलाही जर वैद्यकीय मान्यता मिळाली तर आम्हीदेखील आमच्या पद्धतीने उपचार करायचे का असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

मुंबई पोलीस कायमच ट्विटवर अॅक्टीव्ह असतात आणि तरुणाईच्या भाषेत ट्विट करण्यासाठी ते लोकप्रिय आहेत. त्यामुळे अनेक वेळा मुंबई पोलीस त्यांच्या अनोख्या शब्दांमध्ये तरुणाईमध्ये जनजागृती करताना दिसून येतात.