‘मर्डर २’, ‘पीएम नरेंद्र मोदी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या प्रशांत नारायणन या अभिनेत्याला पत्नीसह अटक करण्यात आली आहे. निर्मात्याची १.२० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप प्रशांतवर आहे. केरळ पोलिसांनी मुंबईत ही कारवाई केली असून प्रशांत व त्याच्या पत्नीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

”थॉमस पेनिकर या मल्याळम चित्रपटाने प्रशांतविरोधात तक्रार दाखल केली होती. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटात त्यांनी प्रशांतसोबत काम केलं होतं. चित्रपटादरम्यान दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली. माझ्या सासऱ्यांची मुंबईत एक कंपनी आहे. तिथे गुंतवणूक केल्यास तुम्हाला कंपनीचा संचालक बनवले जाईल असे आमिष दाखवून प्रशांतने त्यांच्याकडून १.२० कोटी रुपये लुटले,” अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रशांत व त्यांच्या पत्नीला ट्रान्झिट वॉरंटवर केरळला नेण्यात आले. दोघांना २० सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रशांतने दिल्लीत त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि तिथेच नाटकात काम करायला सुरूवात केली. ९०च्या दशकात तो मुंबईला आला. इथे त्याने हिंदी, मल्याळम या भाषांमधील जवळपास ५० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.