संदीप खरे, संगीतकार

कवी, गीतकार आणि संगीतकार संदीप खरे या टाळेबंदीच्या काळात विविध छंद जोपासत आहेत. लेखन, वाचन करणे, झाडांना पाणी घालणे, चांगले चित्रपट पाहणे यात माझा दिवस कसा जातो हेच कळत नाही. दिवसभर करोनाच्या बातम्या ऐकून लोकांमध्ये नैराश्याचे वातावरण दिसून येते. मात्र याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे संदीप सांगतो. हा दीड ते दोन महिन्याचा कालावधी सर्वाच्याच लक्षात राहील.  दीड ते दोन महिने शाळांना सुट्टी असल्याने लहान मुलेही घरी आहेत. मोठी माणसे घरातूनच कार्यालयीन काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंतही या काळात काही सकारात्मक विचार पोहोचणे गरजेचे आहे, असे संदीप सांगतो. करोनामुळे मिळालेल्या सुट्टीचा सदुपयोग करत तो स्वत: कविता करणे, आई-वडिलांना पुस्तके वाचून दाखवणे यात रमला आहे.

लहानपणापासून वाचनाची आवड जोपासणाऱ्या संदीपला पुस्तकांचे भयंकर वेड आहे. माझ्या घरी सातशे ते आठशे पुस्तकांचा संग्रह आहे. या दीड महिन्यांच्या कालावधीत मी राहून गेलेली पुस्तके वाचून काढतो आहे. वाचन करण्याबरोबरच मुले आणि आईवडिलांना गो. नी. दांडेकर, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, दि. बा. मोकाशी यांच्या कथाही वाचून दाखवतो. आज बहुतांश घरात मुले इंग्रजी माध्यमात शिकतात. लिहिणे, वाचणे, बोलणे सर्व इंग्रजी भाषेतून होत असल्याने मराठी भाषा कानावर पडत नाही. मराठी भाषेत अनेक लेखक, कवींनी दर्जेदार साहित्याची निर्मिती केली आहे. कथा आणि कविता वाचून दाखवल्याने त्याद्वारे साहित्य मुलांपर्यंत पोहोचते. त्यांना वाचनाची गोडी लागते. आई-वडिलांना वार्धक्यामुळे वाचायला जमत नाही. त्यांना एखादी कथा अथवा कविता वाचून दाखवल्यास त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असतो, असे सांगणारा संदीप कथेचे अभिवाचन केल्याने मुलांवर वाचनाचे संस्कार होत असल्याचे आवर्जून नमूद करतो.

या व्यतिरिक्त मी घरी भाज्या आणणे, त्या निवडणे, झाडांना पाणी घालणे, घराची साफसफाई करणे, स्वयंपाकात मदत करणे ही कामेही आवडीने करतो, असेही तो सांगतो.  माझ्या घरी असलेल्या झाडाझुडपांची मनापासून काळजी घेतो आहे. त्यांना दररोज पाणी घालणे, त्यांची काळजी घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे ही माझी आवडती कामे असल्याचे संदीपने सांगितले. उरलेल्या वेळेत मी सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेबमालिका पाहतो आहे. नुकतीच नेटफ्लिक्सवर ‘ब्लॅकलिस्ट’ ही वेबमालिका तर ‘मॅरेज स्टोरी’ हा चित्रपट पाहिला. या चित्रपटांचे छायाचित्रण, कलाकारांचा अभिनय, संगीत, आशय ही वैशिष्टय़े भावली असल्याचेही त्याने सांगितले.

संकलन – मानसी जोशी