जात लपवण्यासाठीच माझ्या वडिलांनी म्हणजेच हरिवंशराय बच्चन यांनी बच्चन हे आडनाव स्वीकारलं असा खुलासा बिग बी अमिताभ बच्चन यांनी केला आहे. कोची येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जाहिरात संघाच्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या वडिलांचे आडनाव म्हणजेच आमचे आडनाव श्रीवास्तव असे होते. मात्र आडनावावरून जात किंवा धर्म ओळखण्याची प्रथा आपल्या भारतात आहे. जात, धर्म यावर माझ्या वडिलांचा विश्वास नव्हता. समाजातून ही प्रथा बंद झाली पाहिजे म्हणून त्यांनी श्रीवास्तव हे आडनाव सोडले आणि बच्चन हे आडनाव स्वीकारले. मग बच्चन हे सगळ्या कुटुंबीयांचे आडनाव झाले असेही अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.
समाजात हा ब्राह्मण, हा दलित, हा क्षत्रिय अशा जाती पातींमध्ये समाज विखुरला गेला. हे असे असू नये हे माझ्या वडिलांना वाटत असे. आडनावावरून जात ओळखता येऊ नये म्हणून त्यांनी श्रीवास्तव हे आडनाव सोडले आणि बच्चन हे आडनाव स्वीकारले. मी त्यांची परंपरा पुढे चालवली. बच्चन या आडनावाचा गर्व आहे, माझे आडनाव बच्चन असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी आजवर एकदाही तंबाखू, दारू यांच्या जाहिराती मी एकदाही केलेल्या नाहीत. मी कायम स्वच्छ भारत अभियान, पोलिओ मुक्ती मोहीम तसेच कॉर्पोरेट जाहिराती केल्या आहेत.
१५ फेब्रुवारीला अमिताभ बच्चन यांना हिंदी सिनेसृष्टीत ५० वर्षे पूर्ण झाली. १५ फेब्रुवारी १९६९ रोजी त्यांनी सिनेमा जगतात पाऊल ठेवलं होतं. सात हिंदुस्थानी हा त्यांचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर त्यांनी राजेश खन्नासोबत आनंद हा सिनेमा केला. या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना पहिले फिल्मफेअर मिळाले. १९७३ मध्ये आलेला जंजीर हा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. या सिनेमानंतर त्यांना अँग्री यंग मॅन हे बिरूद लागले. आता त्यांनी सिनेसृष्टीत ५० वर्षे पूर्ण होतानाच बच्चन आडनाव वडिलांनी का स्वीकारलं त्याचं कारण सांगितलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2019 1:42 pm