वादविवाद आणि हो-नाहीच्या तालावर रखडलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत आणि या टीझरची सुरुवात त्यांच्या भारदस्त आवाजाने होते. ‘झुंड नहीं कहिए.. टीम कहिए सर..’ हा संवाद सुरुवातीला ऐकायला मिळतो आणि काही मुलांची टीम हातांमध्ये विविध शस्त्र घेऊन जात असते. १ मिनिट १२ सेकंदांच्या या टीझरने चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता निर्माण केली आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे हिंदीत पदार्पण करत आहेत आणि पदार्पणातच बिग बींसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. अजय-अतुल या जोडीगोळीने चित्रपटाला संगीत दिले आहे. त्यांच्या दमदार संगीताची झलक या टीझरमध्येही पाहायला मिळते.

‘झुंड’ हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. त्यांच्या याच कथेवर हा चित्रपट आधारित आहे. ८ मे २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : ‘तान्हाजी’ची दहा दिवसांत बक्कळ कमाई; तिकिटबारीवर गर्दी  

या चित्रपटाच्या निर्मात्या सविता हिरेमथ यांनी या दोन दिग्गज कलाकारांना एकत्र आणले आहे. ‘खोसला का घोसला’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. एका मुलाखतीत त्यांनी हे दोन कलाकार एकत्र कसे आले यामागची गोष्ट सांगितली. त्या स्वतः नागराज मंजुळेंना भेटण्यासाठी पुण्याला गेल्या होत्या. मंजुळेंशी बोलताना त्यांच्या लक्षात आले की, ते बिग बी यांचे मोठे चाहते आहेत. हिरेमथ यांनी नागराज मंजुळेंना सांगितले की, “तुमचा होकार असेल तर, मी अमिताभ बच्चन यांच्याकडे चित्रपटाचा प्रस्ताव मांडू शकते.” त्यांच्या होकारानंतर हिरेमथ यांनी बिग बी यांच्याकडे प्रस्ताव मांडला. नंतर अमिताभ बच्चन यांनी सैराट बघितला व या चित्रपटासाठी होकार कळवला.