विद्यापीठाचे मंजुळे यांना पत्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर उभारण्यात आलेला चित्रीकरणाचा सेट आठ दिवसात हलवण्यात यावा, असे पत्र दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना गुरुवारी देण्यात आले.  कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री रवींद्र वायकर यांनी बुधवारी विद्यापीठाला भेट दिली होती. या भेटीत नागराज मंजुळे यांना चित्रीकरणाच्या सेटसाठी परवानगी देण्यापूर्वी विद्यापीठाने जिल्हा प्रशासन अथवा उच्च तंत्रशिक्षण विभागाची परवानगी घेतली होती का, अशी विचारणा करत कुलगुरु डॉ. नितीन करमळकर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश वायकर यांनी दिले होते. या संपूर्ण प्रकरणात विद्यापीठाने अग्निशामक दल आणि अशा अन्य कोणत्याही घटकांची परवानगी घेतली नाही याबद्दलची नाराजीही वायकर यांनी व्यक्त केली होती.

या पुढे असा कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास संबंधितांकडून परवानग्या घ्याव्यात असेही वायकर यांनी सांगितले होते. सूचना करुनही विद्यापीठाने कारवाई न केल्यास सेट जप्त करा, असे आदेशही वायकर यांनी जिल्हा प्रशासनाला या वेळी दिले होते. डॉ. करमळकर म्हणाले,‘ या सर्व घटनेनंतर पुरेशा परवानग्या न घेता मंजुळे यांना चित्रीकरणासाठी जागा द्यायला हवी होती आणि ही कुलगुरु म्हणून माझी जबाबदारी आहे असे मी मानतो. फुटबॉल विषयाचे शिक्षण देणारा चित्रपट म्हणून सहानुभूतीपूर्वक विचार केला जात होता, मात्र आता आठ दिवसात मंजुळे यांनी सेट काढावा अशा आशयाचे पत्र देत आहोत.’

नुकसान होऊ नये असाच प्रयत्न

सिंहगड सोसायटीतील महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या थकलेल्या वेतनासंदर्भात माहिती घेतली असून विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे नुकसान होऊ नये असाच प्रयत्न असेल. पुढील वर्षीच्या प्रवेशांबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नाही. मात्र अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला सिंहगड संस्थेबाबतच्या वस्तुस्थितीची कल्पना देऊ. प्राध्यापकांच्या वेतनासंबंधी प्रा. नवले यांना भेटीसाठी बोलविले होते, मात्र त्यांनी प्रतिनिधी पाठवले होते. आता गरज पडल्यास मी पुढे होऊन प्रा. नवले यांची भेट घेईन, असे कुलगुरु डॉ. करमळकर यांनी सांगितले.