आपल्या लेकरासाठी स्वत:च्या सुखांचा त्याग करण्याचं धाडसं जर कोणामध्ये असेल तर ती व्यक्ती म्हणजे आई. सगळ्या प्रेमाची समीकरणं बदलली तरी आई- मुलाच्या प्रेमाच्या समीकरणात किंचितसाही फरक होणार नाही. जागतिक मातृदिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आईच्या आठवणीत ट्विटरवर भावूक पोस्ट लिहिली आहे.

‘आई तीन महिन्यांपूर्वी गेली आणि मी अचानक मुलाचा म्हातारा झालो. आता कोणी दम देत नाही,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. नानांची आई निर्मला पाटेकर यांचे जानेवारीत वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९९ वर्षांच्या होत्या.

नाना पाटेकर आईसोबत वन बीएचके फ्लॅटमध्ये राहत होते. आईच्या निधनापूर्वी एका मुलाखतीत बोलताना ते भावूक झाले होते. ‘मी जेव्हाही आईबद्दल बोलत असतो तेव्हा मला काहीतरी होतं… मला माहीत आहे की ती या जगाचा कधीही निरोप घेऊ शकते, त्यामुळे जेव्हा मला फोन येतो तेव्हा मी घाबरतो. जेव्हाही आई मला बाहेर जाताना पाहते, तेव्हा ती माझा हात पकडते आणि रडायला लागते’ असं त्यांनी म्हटलं होतं.