अमेरिकेनंतर लंडनवारी
अमेरिका गाजविल्यानंतर ‘नटसम्राट’मधील ‘आप्पासाहेब बेलवलकरां’चा अजरामर संवाद ‘कुणी घर देता का घर’चा नाद लंडनमधील चित्रपटगृहात घुमणार आहे. ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान लंडनमधील अनेक चित्रपटगृहात ‘नटसम्राट’ची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. यानिमित्ताने ‘नटसम्राट’ चित्रपटातील कलावंतही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अपूर्व प्रतिभेने मराठीत अद्वितीय ठरलेल्या ‘नटसम्राट’ नाटकावर आधारित चित्रपटाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट-असा नट होणे नाही’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तिकीटबारीवर गर्दी केल्याने अवघ्या दोन आठवडय़ाभरात या चित्रपटाने २० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाचे राज्यभरात सध्या ४०० चित्रपटगृहांमधून रोज १५०० शो दाखवण्यात येत आहेत. सध्या परदेशवारीवर असलेल्या या चित्रपटाचे अमेरिके त ६० शो झाले असून आता लंडनवारीची तयारी सुरू असल्याची माहिती दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिली. अप्पासाहेब बेलवलकर ही अत्यंत गाजलेली व्यक्तिरेखा अभिनेता नाना पाटेकर साकारत असल्याने खास नानांच्या शैलीत ‘कुणी घर देता का घर’ सारखे अजरामर संवाद ऐकायला प्रेक्षक गर्दी करत आहेत. या चित्रपटात अभिनेते विक्रम गोखले, सुनील बर्वे आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर, मृण्मयी देशपांडेसारख्या कसदार कलावंतांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटाला परदेशातही प्रचंड प्रतिसाद असल्याचे मांजरेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मराठी चित्रपट बघण्यासाठी तिकीटबारीवर गर्दी होणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ‘नटसम्राट’ चित्रपटाला राज्यात प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळते आहे. याच धर्तीवर हा चित्रपट परदेशात काही ठिकाणी प्रदíशत करण्यात आला आहे. तिथे एकाच दिवशी तीन हजार प्रेक्षकांनी तिकिटे आरक्षित केली आहेत. लंडनमध्येही पंधरा शो दाखवण्यात येणार आहेत. यावेळी मी, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, अजित परब, मृण्मयी देशंपाडे, नेहा पेंडसे अशी चित्रपटातील कलावंतमंडळी प्रेक्षकांना भेटणार आहोत आणि चित्रपटाविषयी त्यांना काय वाटते हे जाणून घेणार आहोत.
-महेश मांजरेकर, दिग्दर्शक/अभिनेता

‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकर ऊर्फ आप्पासाहेब बेलवलकर ही अजरामर व्यक्तिरेखा यापूर्वी अनेक दिग्गज्जांनी साकारली आहे. मी माझ्या परीने भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. याचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे, याचा आनंद आहे.
-नाना पाटेकर, अभिनेता