संपूर्ण देशात सध्या करोना विषाणूने थैमान घातले आहे. शेकडो लोकांना या प्राणघातक विषाणूमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. लोक बेरोजगार झाले आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर्स मात्र स्वत:च्या जीवाची पर्वा न करता करोनाशी लढा देत आहेत. लोकांचे प्राण वाचवत आहेत. अभिनेता सलमान खानने या डॉक्टरांचे कौतुक केले आहे. त्यांना डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कामाला सलाम केलं आहे.

अवश्य पाहा – “जय जय महाराष्ट्र माझा”; पूजा भट्टनं केलं लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचं कौतुक

“आज डॉक्टर्स डे आहे. सर्व डॉक्टरांना मनापासून धन्यवाद. तुमच्या समर्पणाला आमच्या सर्वांचा सलाम. या प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही देशाचे आधार स्तंभ आहात. तुमचं कौतुक करु तितकं कमी आहे.” अशा आशयाचे ट्विट करुन सलमान खानने डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सलमान खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा – हा फोटो कसला ओळखा पाहू? डोसा आणि ग्रहावरुन नेटकऱ्यांमध्ये जुंपली

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत तब्बल १८ हजार ६५३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ५०७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ वर पोहचली आहे. एकूण करोनाबाधितांमध्ये २ लाख २० हजार ११४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ३ लाख ४७ हजार ९७९ जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत करोनामुळे देशभरात १७ हजार ४०० जणांना जीव गमावावा लागलेला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.