आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार आहे. पण या वितरणाला गालबोट लागण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे राष्ट्रीय पुरस्कार हे राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येतात. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. ते संपूर्ण सोहळ्यात जरी उपस्थित राहू शकणार नसले तरी ११ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पण नेमकी कोणते पुरस्कार ते देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. पण यावर अनेक कलाकारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं नाही, तर सोहळ्यावर बहिष्कार टाकू, असा पवित्रा पुरस्कार विजेत्यांनी घेतला आहे.

आपल्या निर्णयाचे समर्थन करताना कलाकार म्हणाले की, राष्ट्रीय पुरस्कार हा राष्ट्रपतींकडूनच दिला जातो. त्यामुळे आम्हालाही राष्ट्रपतींच्याच हस्ते हा पुरस्कार मिळावा असे वाटते. स्मृती इराणींकडून पुरस्कार घेण्यास आमचा विरोध नाही. इतर कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात आम्ही स्मृती इराणींकडून पुरस्कार स्वीकारला असता. पण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा राष्ट्रपतींच्याच हस्ते मिळावा या मतावर अनेक कलाकार ठाम आहेत.

सर्वसामान्यपणे तांत्रिक पुरस्कार आधी देण्यात येतात. या पुरस्कारांनंतर मुख्य पुरस्कारांचे वितरण होते. आता राष्ट्रपती नेमके कोणते पुरस्कार देणार आहेत हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही.