देशभरात करोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यानंतर अनेकजण आपल्या घरापासून लांब अडकून पडले. अशा परिस्थितीमध्ये आईची तब्बेत बिघडल्यामुळे अभिनेत्याने स्वत:च्या गाडीने मुंबई ते गुजरात प्रवास केला. हा अभिनेता म्हणजे स्टारप्लस वाहिनीवरील ‘नजर’ या मालिकेत काम करणारा हर्ष राजपूत आहे.

‘आजतक’ने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई ते गुजरात प्रवास करण्यासाठी हर्षने दोन्ही राज्यांची परवानगी घेतली होती. ‘मला माझ्या आईला भेटायचे होते. त्यामुळे मी दोन्ही राज्यांची परवानगी घेऊन आलो आहे’ असे त्याने म्हटले आहे. हर्षच्या आईची तब्बेत बिघडली होती आणि त्या गुजरातमधील नवसारी येथे एकट्या राहत होत्या. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी हर्षला गुजरातला पोहोचायचे होते.

‘मला माझ्या आईची काळजी वाटू लागली होती. म्हणून मी परवानगी घेऊन आलो आहे. मी गुजरातमध्ये पोहोचताच पोलिसांना माहिती दिली आणि चेकअप करुन घेतला. त्यांनी मला १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन केले आहे. पण मी माझ्या आईकडे आल्यामुळे मी आनंदी आहे. आता ती एकटी नाही’ असे हर्षने पुढे म्हटले आहे.

हर्ष मुंबईमध्ये वडिल आणि भावासोबत राहत आहे. पण गुजरातमध्ये राहत असलेल्या त्याच्या आईची तब्बेत अचानक बिघडल्यामुळे त्याने तिकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. हर्षने प्रवासा दरम्यानचा अनुभव देखील सांगितला आहे. ‘मुंबईहून गुजरातला जातान मला झोम्बी वर्ल्डमध्ये आल्यासारखे वाटत होते. रस्त्याला कोणी माणसे नाहीत. संपूर्ण हायवे रिकामा. पण मी प्रवासादरम्यान काळजी घेतली’ असे त्याने म्हटले आहे.