आपल्याला चांगल्या वाटतील अशा निवडक भूमिकांमधूनच प्रेक्षकांसमोर येण्याचा निर्णय अभिनेता सैफ अली खानच्या फारसा पथ्यावर पडलेला दिसत नाही. त्यामुळे २०१५ या वर्षांत एकापाठोपाठ एक आलेले त्याचे चित्रपट आपटल्यानंतर त्याने पुढचे वर्ष चित्रपटांपासून दूर राहणे पसंत केले होते. २०१७ मध्ये त्याने पुन्हा विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ आणि राजा कृष्णा मेनन दिग्दर्शित ‘शेफ’ हे दोन चित्रपट केले. या दोन्ही चित्रपटांना तिकीटबारीवर यश मिळाले नसले, तरी सैफच्या अभिनयाची प्रशंसा झाली. त्यानंतर २०१८ मध्ये मात्र चित्रपटांपेक्षा ओटीटी प्लॅटफॉम्र्ससारख्या नव्या माध्यमाने त्याला हात दिला. ‘नेटफ्लिक्स’वर ‘सेक्रेड गेम्स’ ही वेबसीरिज सैफने केली आणि पुन्हा त्याच्या अभिनयाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे योग्य वेळी डिजिटल माध्यमात येण्याचा आपण घेतलेला निर्णय हा शहाणपणाचा ठरला, असे सैफ म्हणतो.

‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजचा सीक्वेल १५ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतो आहे. या सीक्वेलमध्येही सैफ अली खान त्याची इन्स्पेक्टर सरताज सिंगची भूमिका पुढे नेताना दिसणार आहे. गणेश गायतोंडेचे साम्राज्य आणि ते मोडून काढण्याची सरताजची धडपड पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असली तरी सीक्वेल हा मूळ वेबसीरिजपेक्षा अधिक रंजक असेल, असे सैफने स्पष्ट केले. डिजिटल माध्यमावरील आशयाची मांडणी, त्याची गती, त्याचा स्वर आणि इथे करावा लागणारा अभिनय या सगळ्यातच खूप मोठा फरक असल्याचे त्याने सांगितले. वेबसीरिजमध्ये अनेकदा तुम्हाला शांत, सहज अभिनय करावा लागतो. म्हणजे इथे तुम्हाला कॅमेऱ्यावर जास्त विश्वास ठेवावा लागतो, तुम्ही अचूकपणे हावभाव करत आहात असं तुम्हाला आतून वाटत असेल तर कॅमेऱ्यानेही ते योग्यपणे पकडलेले असते, असं तो म्हणतो.

चित्रपट आणि वेबसीरिज या दोन्ही माध्यमांतील फरक प्रेक्षकांनाही हळूहळू समजून घ्यावा लागणार आहे, असं त्याला वाटतं. वेबसीरिज पाहताना अनेकदा एकपडदा चित्रपटगृहांचा जो प्रेक्षक आहे, जो प्रामुख्याने मसालापटांमध्ये रमणारा आहे, त्यांना समोर जे चाललं आहे ते फार संथ आहे किंवा पुढे काही घडतच नाही आहे, काही अभिनयच करत नाही आहेत, असं वाटू शकतं. प्रत्यक्षात ते तसं नसतं, तुम्ही तुमचा अभिनय के लेला असतो. ही दोन्ही माध्यमं वेगळीच आहेत आणि मी आता कुठल्याही एका माध्यमाला मानत नाही. डिजिटल माध्यमात येणं हा माझ्या दृष्टीने खूप मोठा शहाणपणाने घेतलेला निर्णय आहे, असेही त्याने पुन्हा सांगितले. ‘सेक्रेड गेम्स’ ही नेटफ्लिक्सची निर्मिती असलेली पहिली मूळ हिंदी वेबसीरिज होती. त्या वेळी ती इतकी लोकप्रिय होईल, याची कल्पना नव्हती. मात्र ती लोकांना भलतीच आवडली, त्यामुळे त्याचा दुसरा भाग आणताना अधिक अभ्यास करण्यात आला असल्याची माहितीही सैफ ने दिली.

‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सीझन हा खूप हुशारीने लिहिलेला आहे, असं तो म्हणतो. याचा पहिला सीझन हा अगदीच प्राथमिक होता, त्यात तुम्हाला या सगळ्या व्यक्तिरेखा, त्यांची ‘पार्श्वभूमी, त्यांच्या कथा यांची ओळख झाली. दुसरा सीझन हा एकाच वेळी त्यांच्या भूतकाळात जातो आणि पुन्हा भविष्यात डोकावतो. दोन्ही काळांतील घटना एकमेकांमध्ये घट्ट गुंफून घेऊन ही कथा पुढे नेण्यात आली आहे, असं त्याने सांगितलं. या सीझनमध्ये सरताजच्या व्यक्तिरेखेत मात्र फारसा बदल झालेला नाही, हेही त्याने स्पष्ट केलं. सरताज हा मुळातच आत्मविश्वास नसलेला, सतत गोळ्या-औषधं यांच्या आधारावर जगणारा असा आहे. याही भागात तो काही खूप बदललेला नाही आहे, त्याचा मूळ स्वभाव तसाच आहे. तो सगळ्या गोष्टी सुधारणार आहे, अशी कल्पना करण्यात अर्थ नाही, असं सैफ म्हणतो. आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षाही सरताजची भूमिका त्याने जास्त काळ साकारली आहे, तो खूप वेळ या व्यक्तिरेखेत राहिला आहे. सरताज हा खूप प्रेमळ, पण तितकोच सगळं बिघडवून टाकणारा माणूस असल्याचे तो सांगतो. या सीझनसाठी शारीरिक बदल करावे लागले असल्याचे सैफने सांगितले. मागच्या वेळी या भूमिकेसाठी त्याला वजन वाढवावे लागले होते. मात्र आता कथेनुसार तो सतत एका व्यक्तीच्या मागावर आहे, त्यामुळे त्याची तहानभूक हरपली आहे, तो खूप निराश आहे. सरताजची एकूण स्थिती लक्षात घेत या भूमिकेसाठी सैफला बारीक व्हावे लागले आहे.

‘सेक्रेड गेम्स’साठी चित्रपटापेक्षा जास्त काळ चित्रीकरण करावे लागले आहे. शिवाय, सरताजच्या व्यक्तिरेखेने त्याला लोकप्रियताही मिळवून दिली आहे. त्यामुळे या भूमिकेतून बाहेर पडणे अवघड जाईल का? यावर सरताज ही तुम्ही दीर्घकाळ त्या व्यक्तिरेखेत गुंतून राहाल, अशी भूमिका नसल्याचे त्याने स्पष्ट केले. सरताज हा अत्यंत साधा-सरळ व्यक्ती आहे. मूळ कादंबरीत तर तो फिट आणि उत्तम दिसणारा, टापटीप राहणारा असा अधिकारी आहे, वेबसीरिजमध्ये मात्र तो याच्या उलट दाखवला गेला आहे. या सीरिजसाठी सरताजची भूमिका विकसित करताना एका क्षणी आम्हाला कादंबरीप्रमाणे तो गवसला, असं सैफ म्हणतो. अर्थात, या भूमिकेसाठी खूप काळ चित्रीकरण केले आहे. दिवसभरात १६ तास आम्ही चित्रीकरण करत होतो. त्यामुळे सकाळी उठा, पगडी बांधा आणि त्यात दिवसभर वावरा ही सवय लागली आहे. त्या अर्थाने, ही भूमिका सहजी विसरणे शक्य नाही, असं त्याने सांगितलं. ‘सेक्रेड गेम्स २’ची नेमकी कथा काय, याचे तपशील देणे त्याने टाळले. मात्र या सीझनची कथा अधिक रंजक आणि अस्सल भारतीय मातीतली आहे हे जाणवेल, असं तो म्हणतो. यातला बराचसा कथानकाचा भाग हा आश्रमात घडतो. त्यामुळे यात आश्रम आहे, माफिया आहे, बॉलीवूड आहे आणि राजकारणही आहे, असं तो म्हणतो.

राजकारणाचा संदर्भ निघाला, की अनेकदा वेबसीरिज वादात सापडण्याचीच शक्यता असते, पण यावरही गांभीर्याने काम केले असल्याचे त्याने सांगितले. कथा म्हणून राजकारण आणि इतर घटक त्यात आवश्यक होते. त्यामुळे ते घेतानाही आम्ही कुठेही वादात सापडणार नाही याची काळजी घेऊनच लेखन करण्यात आले असल्याचे त्याने सांगितले. ही वेबसीरिज सगळ्यांनी बघावी, अशीच आमची इच्छा आहे. यातून कुठलेही वाद निर्माण व्हावेत हा उद्देशच नसल्याने होताहोईतो वादग्रस्त संदर्भ लेखनातच टाळलेले आहेत, असं त्याने स्पष्ट केलं. अगदी माझ्या कथेत तर अर्वाच्य भाषा आणि लैंगिक दृश्ये दोन्हीही नाहीत, असं तो गमतीने सांगतो. याचे श्रेय तो लेखक-दिग्दर्शक दोघांनाही देतो. सुरुवातीला सैफ अली खानच्या काही भागांचे दिग्दर्शन विक्रमादित्या मोटवाने याने केले होते. या वेळी त्याचा चित्रीकरणाचा भाग हा ‘मसान’ फेम दिग्दर्शक नीरज घेवानने दिग्दर्शित केला आहे. विक्रम हा आंतरराष्ट्रीय आशय आहे, असा विचार करून खूप गांभीर्याने दिग्दर्शन करतो. तर त्याउलट नीरज अधिक शांतपणे, मोकळेपणाने ही दृश्ये चित्रित करतो इतकाच फरक आहे. दोन्ही दिग्दर्शक एक अभिनेता म्हणून माझ्याकडून सर्वोत्तम काम करून घेतात यात शंका नाही, अशा शब्दांत त्याने आपल्या दिग्दर्शकांचे कौतुक के ले.

‘सेक्रेड गेम्स २’पाठोपाठ चित्रपटांमधूनही तो सशक्त भूमिकांमधून लोकांसमोर येणार आहे. नवदीप सिंग दिग्दर्शित ‘लाल कप्तान’ आणि नितीन कक्कर दिग्दर्शित ‘जवानी जानेमन’ हे दोन चित्रपट वेगळे ठरणार आहेत. याशिवाय, ‘तानाजी – द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातूनही तो वेगळ्या भूमिकेतून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा आहे. एकंदरीतच यंदाचे वर्ष ‘सेक्रेड गेम्स २’ आणि चांगले चित्रपट यांनी भरलेले असल्याने सैफ अली खानमधील अभिनेता सुखावला आहे.