सध्या छोट्या पडद्यावर अनेक दर्जेदार मालिकांची निर्मिती करण्यात येत आहे. यात अनेक मालिका या स्त्रीप्रधान असल्याचं पाहायला मिळतं. याच मालिकांच्या यादीत आता आणखी एका नव्या मालिकेची भर पडली आहे. ‘स्वाभिमान’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून एका हरहुन्नरी तरुणीची कथा उलगडली जाणार आहे.

एका लहानशा गावात वाढलेल्या पल्लवीने शिक्षिका होण्याचं स्वप्न पाहिलं आहे. परंतु, तिच्या या स्वप्नांच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. मात्र, स्वप्नांचा पाठलाग करत ती तिचं ध्येयं कशा पद्धतीने गाठते याची रंजक गोष्ट स्वाभिमान मालिकेतून उलगडेल. या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर, अभिनेता अक्षर कोठारी महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

‘स्वाभिमान हा एका मुलीच्या, बाईच्या आयुष्यातला दागिना आहे जो तिने अभिमानाने मिरवायला हवा. स्वाभिमान हे तिचं अस्तित्व आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते कधीही हरवता कामा नये हे या मालिकेतून रसिकांना पाहायला मिळेल. माणसाने स्वाभिमानी असावं ती त्याची ओळख असते,’ असं सतीश राजवाडे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता अक्षर कोठारी बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. त्याच्यासोबत या मालिकेत आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित ही कलाकार मंडळी स्क्रीन शेअर करणार आहेत. येत्या २२ फेब्रुवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.