शाळेतल्या मुलाप्रमाणे मे महिन्याच्या सुट्टीत भरपूर मज्जा करून झाल्यावर परतलेल्या टीव्हीवाल्यांनी ‘ऐका हो ऐका..’ म्हणत गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मालिकांच्या घोषणांनी टीव्हीला दणाणून सोडले आहे. पण, सध्या ज्या मालिकांची दवंडी इतक्या जोरजोरात पिटवली जात आहे, त्या प्रत्यक्षात येण्यासाठी अजूनही किमान चार ते सहा महिन्यांचा अवधी आहे. ज्याप्रमाणे बॉलीवूडमध्ये नव्या वर्षांतील ईद, दिवाळी, ख्रिसमसच्या तारखा आपल्या चित्रपटाच्या नावावर करण्यासाठी शर्यती सुरू असतात, त्याप्रमाणेच टीव्हीवर नवनवे कलाकार आणि कथानक आपल्या नावावर करण्याची रस्सीखेच सध्या वाहिन्यांमध्ये सुरू झाली आहे.
टीव्हीवरही गेल्या काही महिन्यांमध्ये नोंद घेण्याजोगे बदल झाले आहेत, हे नाकारता येणार नाही. त्यातील एक मोठा बदल म्हणजे टीव्हीला सध्या चित्रपटांप्रमाणे भव्यदिव्य सादरीकरणाचा मोह होऊ लागला आहे. त्यामुळे ‘करायचं ते दणक्यात..’ हा नारा वेगवेगळ्या वाहिन्यांनी देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी मोठमोठाले सेट, महागडे तंत्रज्ञान, मोठे कलाकार यांची जुळवाजुळव करण्याची लगबग वाहिन्यांमध्ये लागली आहे. हे सर्व एक-दोन दिवसांचे काम नसून त्यासाठी काही महिन्यांचा काळ देण्याची गरज असते. त्यामुळे प्रत्यक्षात मालिका पडद्यावर येण्यासाठी मात्र चार ते सहा महिन्यांची वाट प्रेक्षकांना पाहावी लागते. अर्थात, वाहिन्यांमध्ये वाढलेल्या स्पर्धेमुळे एका वाहिनीवर येऊ घातलेल्या मालिकेच्या संकल्पनेवर दुसऱ्या वाहिनीवर लगोलग मालिका सुरू होण्याचा ‘योगायोग’ नाकारता येत नाही. त्यामुळे वाहिनीचा आणि पर्यायाने निर्मात्याचा वेळ आणि पैसा दोन्हीचे नुकसान होते. हा ‘योगायोग’ टाळण्यासाठी प्रत्यक्षात वाहिनीवर मालिका येण्यास अवकाश असला तरी त्याची घोषणा काही महिने आधीच करून ठेवण्याची खबरदारी वाहिन्यांक डून घेतली जात आहे.
ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांची चलती असल्याने दोन वर्षांपूर्वी एकाच देवावर आधारित मालिका निर्मिती करण्याचे काम दोन वाहिन्यांनी एकाच वेळी सुरू केले. याबाबतची पहिली घोषणा करण्यात एका वाहिनीला यश आले आणि ती मालिका नंतर सर्वाधिक टीआरपी खेचणारी मालिका ठरली. या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी वाहिनीला मात्र काही दिवसांच्या उशिराने मोठे नुकसान सहन करावे लागले. या गोष्टीवरून बोध घेऊन आता वाहिन्या नव्या मालिकेच्या संकल्पनेवर काम करत असतानाच मालिकेची घोषणा करत आहेत. प्रत्यक्षात ती मालिका पडद्यावर किमान चार ते सहा महिन्यांनंतर येते. ‘संकटमोचन महाबली हनुमान’ मालिकेची घोषणा सोनी टीव्हीकडून जानेवारी महिन्यातच करण्यात आली होती. त्यानंतर कित्येक दिवस त्याबद्दल काहीच माहिती दिली गेली नाही. मालिकेतील पात्रांची निवड आणि चित्रीकरणाला एप्रिलपासून सुरुवातही झाली आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ामध्ये मालिका पडद्यावर आली. याच वाहिनीवरील ‘सूर्यपुत्र कर्ण’ मालिकेची घोषणाही वाहिनीने फेब्रुवारी महिन्यात केली होती. त्यानंतर काही महिन्यांनी त्यातील अभिनेत्यांच्या निवडप्रक्रियेला सुरुवात झाली. आता मालिका पडद्यावर येण्यासाठी प्रेक्षकांना जुलै महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. जानेवारी महिन्यातच ‘सिया के राम’ या नव्या मालिकेची घोषणा ‘स्टार प्लस’ वाहिनीकडून करण्यात आली होती. या मालिकेत सीतेच्या नजरेतून रामायणाची कथा उलगडणार असल्याचे वाहिनीकडून सांगण्यात आले. पण अद्यापपर्यंत सहा महिने उलटून गेले तरीही या मालिकेबद्दल पुढची कोणतीही घोषणा वाहिनी किंवा निर्मात्यांकडून करण्यात आलेली नाही. ट्विटरवर मालिकेचा दुसरा प्रोमो आणि रामाच्या पात्राची निवड झाली असल्याचे निर्मात्यांनी घोषित केले आहे. पण अजूनही वाहिनीकडून परवानगी मिळाली नसल्याने त्याबद्दल कोणतीही घोषणा केली जाणार नसल्याचे निर्मात्यांनी सांगितले. ही एक ‘बिग बजेट’ मालिका असल्याने जाहिरातदार आणि गुंतवणूकदार यांना आकर्षित करण्यासाठी घाईघाईत मालिकेचा पहिला प्रोमो टीव्हीवर आणल्याचे सांगण्यात येते. पण या मालिकेच्या घोषणेमुळे निदान अन्य कोणतीही वाहिनी सीतेकडे किंवा रामायणाच्या कथेकडे वळणार नाही, याची निश्चिंती वाहिनीला असल्याने पुढचा ‘वेळकाढू’पणा त्यांना परवडणारा आहे.  ‘झी टीव्ही’वरील ‘एक था राजा एक थी रानी’ या मालिकेतून अभिनेत्री द्रष्टी धामी पुनरागमन करणार आहे. द्रष्टी सध्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. त्यामुळे तिचे नाव निश्चित करण्यासाठी वाहिनीने फेब्रुवारीमध्येच मालिकेचा पहिला प्रोमो टीव्हीवर दाखविला होता. त्यानंतर द्रष्टीने वास्तव आयुष्यात लग्नाचा निर्णय घेतला. तिचे लग्न झाले. तरीही मालिकेबाबत सारेच निर्मात्यांपासून वाहिनीपर्यंत सगळेच शांत होते. मध्यंतरी द्रष्टीने मालिका सोडल्याची अफवाही सोडली गेली. पण नुकताच मालिकेचा दुसरा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. म्हणजे मालिका सुरू होणार याची खात्री वाहिनीने दिली असली तरी कधी सुरू होणार, हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. मालिकेचे कथानक स्वातंत्र्यपूर्व काळातले असल्यामुळे तो काळ साकारण्यासाठी बराच वेळ आणि पैसा खर्ची घातला जात आहे. परिणामी, मालिका पडद्यावर येण्यास वेळ लागत असल्याचे कारण सध्या तरी झी टीव्हीने पुढे केले आहे. तोपर्यंत ऐतिहासिक मालिकांच्या स्पर्धेत आपण कुठे मागे पडू नये म्हणून झी टीव्हीने ‘राधाकृष्ण एक अनोखी प्रेमकथा’ या मालिकेची घोषणा केली आहे. राधाकृष्णाच्या प्रेमकथेवर आधारित या मालिकेमध्ये राधेचे जीवन उलगडले जाणार असल्याचे वाहिनीने सांगितले आहे. इथेही कथानकावर काम चालू असून पात्रांची निवडही झालेली नाही. त्यामुळे मालिको पडद्यावर येण्यास अजूनही काही महिन्यांचा अवकाश आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘२४’ मालिकेच्या यशानंतरच अभिनेता अनिल कपूरने या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली होती. त्यानंतर मालिकेच्या कथानकावर काम करण्यामध्ये निर्मात्यांची दोन वर्षे गेली. मध्यंतरीच्या काळात मालिकेबद्दल चर्चा होत होत्या. पण सध्या मालिकेसाठी पात्रांची निवड होत असून मालिकेला पडद्यावर येण्यासाठी किमान ऑक्टोबर महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.
बॉलीवूडमध्ये बडय़ा अभिनेत्यांना सणांच्या काळात आपले चित्रपट गाजणार याची खात्री असते. त्यामुळे काही वर्षांपासून ईद, दिवाळी, ख्रिसमससारख्या तारखा आपल्या नावावर नोंदवण्याची घाई त्यांच्याकडून करण्यात येते. कित्येकदा दोन वर्षांनंतरच्या तारखाही आगाऊ नोंदविल्या जातात. टीव्ही वाहिन्यांना मालिकेच्या प्रदर्शनाच्या वेळेपेक्षा त्यातील कलाकार आणि कथानक आपल्याकडे राहील याची खात्री करणे गरजेचे असते. एखाद्या नावाजलेल्या कलाकाराला आपल्या मालिकेसाठी करारबद्ध करूनही ऐनवेळी जास्त पैशांसाठी कलाकाराने दुसऱ्या वाहिनीतील मालिका स्वीकारल्याच्या घटना टीव्हीवर नव्या नाहीत. कित्येकदा वाहिनी आणि निर्मात्यांमध्ये मतभेद झाले की निर्माता त्याच कथानकावर दुसऱ्या वाहिनीवर नवी मालिका सुरू करतो. गेल्या काही वर्षांमध्ये टीव्हीवरील बडय़ा प्रोजेक्ट्सवर वाहिन्या मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. उत्तम तंत्रज्ञ, उत्तम निर्मितीमूल्य, बडे कलाकार यामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च होत आहे. पण अशा प्रकारांमुळे वाहिनीला नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे एकदा मालिकेचा प्रोमो टीव्हीवर आला की कलाकारांचे हात बांधले जातात. तसेच कथानकाबद्दल वाहिनीला शाश्वती मिळते. त्यामुळे आपल्या नव्या मालिकांसाठी आगाऊ दवंडय़ा पिटवण्याची पद्धत वाहिन्यांच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे.