नवीन येणारे प्रत्येक वर्ष नेहमीच आपल्यासोबत उत्साह आणि चैतन्य घेऊन येते. प्रत्येक व्यक्ती आशावादी नजरेने येणाऱ्या वर्षाकडे पाहते. याचबरोबर नवीन वर्षात काय संकल्प करायचा याचा विचार अनेकजण करत असतात. बॉलिवूड कलाकारांनीही नवीन वर्षात काही संकल्प केले आहेत. ‘नवभारत टाइम्स’ने या कलाकारांशी बातचित केली असून त्यांनी काय संकल्प केला आहे, हे जाणून घेतले आहेत.

कोणत्याही प्रकारचा ताण घेणार नाही- विद्या बालन<br />२०१७ मध्ये मी माझ्या कामात इतके व्यस्त होते की, मला जीवनाचा खरा आनंद लुटता आला नाही. त्यामुळे नवीन वर्षात मी कामाचा जास्त ताण घेणार नाही आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात जास्त वेळ देईन असा संकल्प केला आहे.

संगीतावर जास्त भर देणार- आयुषमान खुराना
गेल्या वर्षी मी अभिनयावर जास्त लक्ष केंद्रीत केलं होतं, त्यामुळे संगीताला जास्त वेळ देऊ शकलो नाही. ‘मेरी प्यारी बिंदू’, ‘बरेली की बर्फी’, ‘शुभमंगल सावधान’ या माझ्या तीन चित्रपटांमध्येच मी व्यग्र होतो. नवीन वर्षात जास्तीत जास्त रियाज करण्याचा संकल्प मी केला आहे. त्याचबरोबर वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न करेन.

नवीन वर्षात लेखनही करू इच्छिते- रिचा चड्ढा
‘फुकरे २’च्या यशाचा आनंद मला गेल्या वर्षी मिळाला. त्याचबरोबर प्रियकर अली फजलमुळे माझ्या वैयक्तिक जीवनात बरेच महत्त्वपूर्ण बदल झाले. त्यामुळे २०१७ हे वर्ष माझ्यासाठी खूप आनंददायी ठरलं. आता नवीन वर्षात मी लेखन करू इच्छिते. माझ्या लिखाण कौशल्यावर मी जास्त भर देण्याचा संकल्प केला आहे.

आईला जास्तीत जास्त वेळ देईन- अली फजल
कामाच्या व्यापामुळे मी कुटुंबियांना वेळ देऊ शकलो नाही. नवीन वर्षात तरी मी कुटुंबियांसोबत आणि विशेषकरून माझ्या आईसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करेन. मी तिला वेळ देऊ शकत नसल्याची तक्रार ती नेहमीच करते. नवीन वर्षात तिला ही तक्रार करण्याची संधी मी देणार नाही.

गरजूंना मदत करण्यास प्रयत्नशील राहीन- गौतम रोडे
गेल्या वर्षी मी पार्करच्या ट्रेनिंगसाठी अधिकाधिक वेळ देण्याचा प्रयत्न केलेला. नवीन वर्षातसुद्धा त्यात निपुण होण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर गरजूंची मी कशाप्रकारे मदत करू शकेन याचाही विचार करेन. इतरांची मदत करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन.