01 October 2020

News Flash

BLOG : नवे चेहरे, हवे हवे…

नवीन चेहरे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळाले आहे.

नवीन चेहऱ्यांच्या विविध प्रकारच्या चित्रपटाना प्रेक्षकांनी अनेकदा स्वीकारलयं असेच दिसते.

दिलीप ठाकूर
‘सैराट’च्या खणखणीत यशात त्याची थीम, त्याचे संगीत आणि त्याचा अनपेक्षित धक्कादायक शेवट या बरोबरच महत्त्वाचा वाटा, नवीन चेहर्‍यांचा अर्थात आकाश ठोसर (परश्या) आणि रिंकू राजगुरू (आर्ची) यांचाही त्या यशात मोठाच वाटा आहे. चित्रपटाच्या कथेनुसार यात नवीन चेहऱ्यांना वाव-भाव होताच पण प्रेक्षक देखील बराच काळ तेच तेच चेहरे पाहून कंटाळून गेले होते, त्यानाही सुखद बदल मिळाला.  ‘सैराट’च्या रिमेक ‘धडक’मध्येही इशान खट्टर आणि जान्हवी कपूर अशा अगदी नवीन चेहऱ्यांना पटकथेनुसार संधी मिळाली असून त्यांना चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीत मिळत असलेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांनाही स्वीकारले जाईल असे जाणवते.

अशा नवीन चेहऱ्यांच्या विविध प्रकारच्या चित्रपटाना प्रेक्षकांनी अनेकदा स्वीकारलयं असेच दिसते. अगदी ‘सावन भादो’च्या (१९७०) नवीन निश्चल व रेखा या जोडीपासून नुसती नावे जरी द्यायची झाली तरी ती केवढी तरी होतील. या दोघांचाही हा पहिलाच चित्रपट होय. ‘बॉबी'(१९७३) च्या वेळी ऋषी कपूरकडे ‘मेरा नाम जोकर’मधील शालेय जीवनातील राज कपूर साकारल्याचा अनुभव होता पण डिंपल कपाडिया नवीन होती. ही जोडी फ्रेश आणि कमालीची तजेलदार दिसली आणि चित्रपटाने ज्युबिली यश मिळविले. ‘ज्युली’ आला तेव्हा विक्रम आणि लक्ष्मी ही जोडी फ्रेश होती पण लक्ष्मीने दक्षिणेकडील प्रादेशिक भाषांमधील चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. नवीन जोडी हवीहवीशी वाटणे यात सचिन व सारिका यांच्या ‘गीत गाता चल’चाही उल्लेख हवाच, फरक इतकाच की त्यांनी तत्पूर्वी बालकलाकार म्हणून काम केले होते. नवीन चेहरे प्रेक्षकांनी स्वीकारले यात चित्रपटाची केवढी तरी विविधता दिसतेय, आणि तेच तर महत्वाचे आहे. म्हणूनच नवीन चेहऱ्यांच्या चित्रपटाचे आकर्षण कायम राहीले.

अमोल पालेकर व विद्या सिन्हा (रजनीगंधा), कमल हसन व रति अग्निहोत्री (एक दुजे के लिए ), कुमार गौरव व विजेयता पंडित (लव्ह स्टोरी), सनी देओल व अमृता सिंग (बेताब), विशाल आनंद व नाझनीन (चलते चलते), बॉबी देओल व ट्विंकल खन्ना (बरसात),  राहुल राय व अनू अगरवाल (आशिकी), विवेक मुशरन व मनिषा कोईराला (सौदागर), हरिश व करिश्मा कपूर (प्रेम कैदी), ह्रतिक रोशन व अमिषा पटेल (कहो ना प्यार है), शाहिद कपूर व अमृता राव (इश्क विश्क), अभिषेक बच्चन व करिना कपूर (रिफ्युजी), रितेश देशमुख व जेनिलीया डिसोझा (तुझे मेरी कसम) वगैरे वगैरे. यात प्रेमकथांचा वाटा जास्त दिसतोय. पण त्यातच ‘एक दुजे के लिए’मध्ये आंतरजातीय प्रेम आणि शोकात्म शेवट आहे तर ‘कहो ना प्यार है’मध्ये ह्रतिक रोशनची दुहेरी भूमिका व त्यातून सूड होता. ‘रिफ्यूजी’मध्ये भारत व पाकिस्तान यांच्या सीमेवरील संघर्ष होता. विविध प्रकारच्या चित्रपटातून नवीन चेहऱ्यांना संधी मिळतेय म्हणूनच प्रेक्षकांची अशा नवीन चेहऱ्यांना पाहण्याची ओढ कायम असावी.

प्रेक्षकांना नवीन चेहरे पाह्यला अनेकदा आवडलयं यामध्ये काही विशेष गोष्टी घडल्याचेही दिसते. जॅकी श्रॉफला देव आनंदने ‘स्वामी दादा’मध्ये खलनायकी भूमिका दिली तर मनोजकुमारच्या ‘पेंटरबाबू’मध्ये मिनाक्षी शेषाद्रीला संधी मिळाली. पुढे जॅकी आणि मिनाक्षी ही जोडी सुभाष घईंच्या ‘हिरो’ या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांना भेटायला आली. आणि प्रेक्षकांनी या जोडीला डोक्यावर चलून धरले, जणूकाही हाच त्यांचा पहिला चित्रपट वाटावा. आजही ही जोडी या चित्रपटासाठी ओळखली जाते.

गोविंदा आणि नीलमचा ‘इल्जाम’देखील असाच गोविंदाचा हा पहिलाच प्रदर्शित झालेला चित्रपट, तर नीलमला याच चित्रपटाने प्रसिध्दी मिळवून दिली. ‘इल्जाम’मधील गोविंदाच्या ‘ब्रेक डान्स’चे त्याकाळातील तरुणाईच्या मनावर चांगलेच गारूड होते. चित्रपट प्रदर्शित होताच गोविंदा आणि नीलम ही जोडी रातोरात प्रसिधदीच्या झोतात आली. त्यानंतर मात्र जणू ‘पॅकेज डील’ असल्यागत ते अनेक चित्रपटातून एकत्र आले.

आमिर खानने ‘होली’ नावाच्या चित्रपटात भूमिका केली तत्पूर्वीच त्याचा चुलत भाऊ मन्सूर खान दिग्दर्शित ‘कयामत से कयामत तक’ हा घरचा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यातील त्याची नायिका जुही चावलाने ‘सल्तनत’मध्ये करण कपूरची नायिका साकारली. या चित्रपटात ही जोडी दुय्यम होती, सनी देओल व श्रीदेवी प्रमुख भूमिकेत होते, पण चित्रपट फ्लॉप झाल्याने यामध्ये जुही चावला होती हे लक्षात आले नाही आणि ‘कयामत से….’मध्ये आमिर व तिची जोडी जमली, प्रेक्षकांना आकर्षित करु शकली. सलमान खानने ‘बीवी हो तो ऐसी’मधील छोट्या भूमिकेत तर भाग्यश्री पटवर्धनने ‘कच्ची धूप’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत काम केल्यानंतर हे दोघेही ‘मैने प्यार किया’मध्ये एकत्र आले, ही जोडी जमली, अगदी फ्रेश ठरली आणि चित्रपट सुपरहिट ठरला .’रॉकी’ च्या वेळी संजय दत्त नवीन चेहरा होता पण टीना मुनिम तोपर्यंत एस्टॅब्लिश अभिनेत्री होती. देव आनंदने तिला ‘देस परदेस’मध्ये नवतारका म्हणून संधी दिली होती.

अर्थात नवीन चेहऱ्यांचे सगळेच चित्रपट सुपरहिट ठरतीलच असा काही नियम नाही. ते चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करु शकले नाहीत हेच ठळक कारण आहे. यश चोप्रा रोमँटिक चित्रपटाचे हुकमी नाणे. त्यांनी ‘फासले’मध्ये रोहन कपूर व फराह हे नवीन चेहरे प्रेक्षकांसमोर  आणले, पण चित्रपट एकदमच ‘फसला’ म्हणूनच कधी येऊन गेला हे समजलेच नाही. राजश्री प्रॉडक्शन पूर्वी हमखास नवीन चेहऱ्यांना संधी देई. पण तापस पाल व माधुरी दीक्षित अशा नवीन जोडीचा ‘अबोध’ रसिकांनी नाकारला. पण पहिला चित्रपट फ्लॉप होऊनही माधुरी दीक्षित स्टार झालीच (तिचे सुरुवातीचे बरेच चित्रपट अपयशी ठरले). असेच एक भारी उदाहरण द्यायचे तर रणबीर कपूर व सोनम कपूरच्या ‘सावरियाँ’चे! चित्रपट यशस्वी ठरला नाही पण हे दोन्ही स्टार पुत्र आज स्टार आहेत.

मराठीत ‘सैराट’नंतर नवीन चेहऱ्यांना संधी देणारे किमान तीन डझन चित्रपट आले ही वस्तुस्थिती आहे, पण त्यात जास्त अंधानुकरण दिसतेय. तर ‘ती सध्या काय करते’मध्ये अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर ही जोडी फ्रेश होती. फार पूर्वी ‘बॉबी’ची रिमेक म्हणून आलेल्या ‘प्रीत तुझी माझी’मधील महेश कोठारे व राधिका बारटक्के ही जोडी नाकारली. याचे ठळक कारण म्हणजे आपल्या मराठी प्रेक्षकांना अशी धाडसी प्रेमकथा रुचणे तेव्हा शक्य नव्हते. या चित्रपटाचे एकच विशेष म्हणजे महेश कोठारे बालकलाकार म्हणून वाटचाल करताना या चित्रपटात वयात आला. तर महेश कोठारे दिग्दर्शित ‘जिवलगा’ या चित्रपटाची रोमँटिक जोडी नवीन चेहरे तुषार दळवी व रेशम टिपणीस पडद्यावर छान जमली. पण रसिकांनी चित्रपट नाकारला.

असो. नवीन चेहऱ्यांच्या चित्रपटात एक प्रकारचा ताजेपणा जाणवतो म्हणूनच ते अधिक प्रमाणात यशस्वी ठरत असले तरी चित्रपटाच्या कथा, पटकथा व दिग्दर्शन सादरीकरण यात प्रामुख्याने चमक-धमक हवीच हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच. हे सर्वच भाषांच्या चित्रपटासाठी महत्त्वाचे आहेच म्हणा. ‘धडक’ हे यातील ताजे उदाहरण आहे. आणि इशान व जान्हवी कपूर हे नवीन चेहरे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकही आहेत. जान्हवी कपूर ही श्रीदेवीची मुलगी अशी एक भावपूर्ण पार्श्वभूमीही आहेच. नवीन चेहर्‍यामागे असेही काही घटक असून ते त्या नवीन चेहऱ्यांना स्वीकारण्याचे एक वातावरणही तयार करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 4:45 pm

Web Title: newcomers in bollywood and film industry
Next Stories
1 BLOG : Imran Khan Affairs मैदानाबाहेरील ‘लव्ह गेमस्’
2 Blog: Happy Birthday MS Dhoni – असा कर्णधार होणे नाही !
3 BLOG : कॅन्सर चित्रपटातील
Just Now!
X